मुंबई : NHI प्रतिनिधी;
लायन्स क्लब इंटरनॅशनल-मुंबईचे डीस्ट्रीक्ट गव्हर्नर डॉ. जगन्नाथराव हेगडे यांच्या वाढदिवस चषक आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धा ब्रीच कॅन्डी हॉस्पिटल संघाने जिंकली. आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी व आयडियल ग्रुप आयोजित चुरशीच्या अंतिम सामन्यात ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलने बलाढ्य सेव्हन हिल्स हॉस्पिटलचा २ विकेटने पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. स्पर्धेमध्ये अरुण पारचाने सर्वोत्तम क्रिकेटपटू, रोहित सोमार्डेने उत्कृष्ट फलंदाज तर प्रदीप क्षीरसागने उत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार पटकाविला. मुंबईचे माजी नगरपाल डॉ. जगन्नाथराव हेगडे, क्रीडापटू दीपक पडते, विजय रायमाने, ज्येष्ठ पंच संदीप ठाकूर, क्रिकेटपटू चंद्रकांत करंगुटकर व शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्या-उपविजेत्यांना गौरविण्यात आले.
शिवाजी पार्क मैदानात ब्रीच कॅन्डी हॉस्पिटल विरुद्ध सेव्हन हिल्स हॉस्पिटलचे कप्तान डॉ. हर्षद जाधव यांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. सेव्हन हिल्स हॉस्पिटलची सलामी जोडी अवघ्या ३ धावसंख्येवर तंबूत परतल्यावर अर्धशतकवीर रोहित सोमार्डे (५६ चेंडूत ५६ धावा) व भावेश डोके (२२ चेंडूत २३ धावा) यांनी आक्रमक फलंदाजी केली. परंतु ब्रीच कॅन्डी हॉस्पिटल तर्फे प्रदीप क्षीरसागर (२८ धावांत ३ बळी), सुदेश यादव (१८ धावांत २ बळी), अर्जुन चीदालीया (२१ धावांत २ बळी) यांनी प्रभावी गोलंदाजी केल्यामुळे सेव्हन हिल्स हॉस्पिटलचा डाव १८.५ षटकात ११० धावसंख्येवर संपुष्टात आला.
प्रत्युत्तर देतांना सलामीवीर प्रदीप क्षीरसागरने (२६ चेंडूत २४ धावा) एक बाजू सावरूनही ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलची तेराव्या षटकाला ६ बाद ५४ धावा अशी बिकट अवस्था झाली. परंतु आठव्या क्रमांकावर फलंदाजीस उतरलेल्या अरुण पारचाने २ षटकार व ३ चौकाराच्या सहाय्याने २७ चेंडूत ४४ धावांची धडाकेबाज फलंदाजी केली. परिणामी ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलने शेवटच्या षटकात ८ बाद ११५ धावा फटकावून बाजी मारली. तृतीय क्रमांकाचा पुरस्कार जे.जे. हॉस्पिटलने मिळविला. स्पर्धेनिमित्त रुग्णालयीन अष्टपैलू क्रिकेटपटू सेव्हन हिल्स हॉस्पिटल क्रिकेट संघाचे डॉ. इब्राहीम शेख व बॉम्बे हॉस्पिटल क्रिकेट संघाचे संतोष रांगवकर यांचा तसेच ज्येष्ठ क्रिकेट पंच संदीप ठाकूर यांचा विशेष गौरव करण्यात आला.
******************************