MUMBAI/NHI/ :
अमीर बिल्डींग हितचिंतक नवरात्रौत्सव मंडळ-डोंगरी आयोजित क्रिकेटपटू प्रमोद सुर्वे स्मृती चषक लीग क्रिकेट स्पर्धेत समीर स्मॅशर्सने अजिंक्यपद पटकाविले. रोहित पारकरच्या अष्टपैलू खेळामुळे समीर स्मॅशर्सने एम.एम. आमरेजचा १३ धावांनी पराभव करून रु.८८,८८८/- सह विजेतेपदाच्या प्रमोद सुर्वे स्मृती चषकाला गवसणी घातली. अष्टपैलू रोहित पारकरला स्पर्धेतील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा फ्रीजसह पुरस्कार देऊन माजी रणजीपटू सुधाकर चव्हाण, दीपक सुर्वे, विलास मटाले आदी मान्यवरांनी गौरविले.
सलामीवीर रोहन पारकर (१६ चेंडूत २५ धावा) व प्रतिक जैन (८ चेंडूत ११ धावा) यांनी धडाकेबाज फलंदाजी केल्यामुळे समीर स्मॅशर्सने एम.एम. आमरेज संघाविरुध्द मर्यादित ५ षटकात ४ बाद ४३ धावा फटकाविल्या. अष्टपैलू रोहन पारकरने (१३ धावांत ३ बळी) अचूक गोलंदाजी करीत प्रतिस्पर्ध्यांचे महत्वाचे फलंदाज टिपले. त्यामुळे एम.एम. आमरेज संघाला ५ षटकात ६ बाद ३० धावसंख्येपर्यंतच मजल मारता आली. परिणामी समीर स्मॅशर्सने अंतिम सामना १३ धावांनी जिंकला. तत्पूर्वी उपांत्य फेरीत समीर स्मॅशर्सने एम.एम.मोटर्सचा ७ धावांनी तर एम.एम. आमरेजने दीक्षिता इलेव्हनचा १० विकेटने पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली होती.