नवी दिल्ली – आंध्र प्रदेशमधल्या विशाखापट्टणम येथून दोन दिवसांपूर्वी एक विवाहित महिला बेपत्ता झाली. महिला समुद्रात बुडाल्याची शंका आल्यामुळे नौदल आणि तटरक्षक दलानं शोधमोहीम सुरू केली.
जवळपास 36 तास सुरू असलेल्या या शोधमोहिमेसाठी एक कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च आला. नौदलाचं एक हेलिकॉप्टर आणि तटरक्षक दलाची तीन जहाजं त्या महिलेला शोधत होती. मात्र प्रत्यक्षात ती विवाहित तरुणी प्रियकरासोबत पळून गेली होती. तिने स्वतःच त्याबद्दलची माहिती आता घरच्यांना दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विशाखापट्टणमच्या आरके बीचवर पती श्रीनिवास यांच्यासोबत 23 वर्षीय साई प्रिया सोमवारी लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आली होती. दोघांनी आधी सिंहाचलम मंदिरात दर्शन घेतलं. तिथून ते समुद्रकिनाऱ्यावर आले. तिथे आल्यावर काही फोटो काढले. व्हिडिओही बनवले. त्याच वेळी श्रीनिवास यांच्या मोबाईलवर कोणाचा तरी फोन आला. त्यामुळे ते बोलण्यात गुंग झाले. बोलणं झालं आणि नंतर पत्नी कुठेच दिसली नाही, म्हणून त्यांनी शोध सुरू केला. तिला फोन करण्याचाही त्यांनी प्रयत्न केला; पण तिच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
अखेर पती श्रीनिवास यांनी थ्री टाउन या स्थानिक पोलिस ठाण्यात पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. त्यानंतर घरच्यांना आणि सासरच्यांनाही त्याने कळवलं. तरुणी समुद्रकिनाऱ्यावरून बेपत्ता झाल्यामुळे समुद्रात गेली असेल, अशी शंका पोलिसांना आली. त्यामुळे नौसेना आणि तटरक्षक दलानं शोध सुरू केला. समुद्रात शोधण्यासाठी मच्छिमार आणि स्कूबा डायव्हिंग करणाऱ्यांना समुद्रात उतरवलं गेलं. नौदलानं एक हेलिकॉप्टर आणि तटरक्षक दलानं 3 बोटींच्या साह्यानं शोधमोहीम राबवली; मात्र तरुणीचा काहीच पत्ता लागला नाही. दरम्यान, तरुणीनं तिच्या आईला टेक्स्ट मेसेज करून ती कुठे आहे, याबद्दल कळवलं. आपला प्रियकर रवी याच्यासोबत नेल्लूरला आल्याचंही तिनं सांगितलं. प्रियकरावर काही कारवाई न करण्याबाबतही तिने कुटुंबीयांना विनंती केली.
थ्री टाउन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक के. रामा राव यांच्या म्हणण्यानुसार, साई प्रियानं तिच्या लोकेशनबद्दल स्वतःच माहिती दिली आहे. ती नेल्लूरमध्ये असून सुरक्षित आहे. ही माहिती खरी असल्याची खात्री पटवण्यात आली आहे. नौदल आणि तटरक्षक दलानं चालवलेल्या या संपूर्ण शोधमोहिमेसाठी जवळपास एक कोटी रुपये खर्च आला. दोन दिवसांपेक्षा जास्त काळ ही मोहीम सुरू होती. विशाखापट्टणम इथे राहणाऱ्या साई प्रिया हिचं 2020 मध्ये श्रीकाकुलममधल्या श्रीनिवास यांच्यासोबत लग्न झालं होतं. साई प्रिया अजून शिकते आहे, तर पती श्रीनिवास हैदराबादच्या एका फार्मसी कंपनीत कर्मचारी आहेत.