मराठी रसिकांच्या भेटीला लवकरच एक नवी कोरी म्युझिकल लव्हस्टोरी येणार आहे. ‘सर्जा’ शीर्षक असलेल्या या चित्रपटातील ‘जीव तुझा झाला माझा…’ हे काही दिवसांपूर्वी संगीतप्रेमींच्या भेटीला आलेलं गाणं चांगलंच गाजत आहे. सोशल मीडियावर या गाण्यावर लाईक्सचा वर्षाव होत असताना ‘सर्जा’मधील ‘धड धड…’ हे डान्स नंबर रिलीज करण्यात आलं आहे. अबालवृद्धांना ताल धरायला लावणाऱ्या या गाण्यावरही रसिक बेहद्द खुश होणार असून, लगीनसराईसोबतच सर्व सणांना तसेच समारंभांना हे गाणं मोठ्या आवाजात वाजणार आहे.
राजवर्धन फिल्म्स क्रिएशनची प्रस्तुती असलेल्या ‘सर्जा’ची निर्मिती अमित जयपाल पाटील यांनी केली असून, रमेश रंगराव लाड या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. संगीतप्रधान ‘सर्जा’ चित्रपटाचं दिग्दर्शन धनंजय मनोहर खंडाळे यांनी केलं आहे. या चित्रपटातील ‘धड धड…’ हे दमदार गाणं नुकतंच लाँच करण्यात आलं आहे. दिग्दर्शक धनंजय खंडाळे यांनीच लिहिलेलं हे गाणं संगीतकार हर्षित अभिराज यांनी स्वत: आदर्श शिंदेच्या साथीनं गायलं आहे. कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला क्षणार्धात ठेका धरायला लावण्याची क्षमता ‘धड धड…’मध्ये असल्याचं गाणं पाहिल्यावर तसंच ऐकल्यावर वाटतं. रात्रीच्या वेळी चित्रीत करण्यात आलेलं ‘धड धड…’ खऱ्या अर्थानं मनाची धड धड वाढवणारं आहे. याबाबत हर्षित अभिराज म्हणाले की, एका सुमधूर ट्यूनवर दिग्दर्शक धनंजय खंडाळे यांनी ‘धड धड…’ हे गाणं लिहिलं आहे. गाण्यातील शब्दरचना ट्यूनला चपखल बसल्याने एक सुरेल गाणं रसिकांच्या सेवेत सादर करण्याची संधी मिळाली. आदर्श शिंदेच्या आवाजानं या गाण्यात एक वेगळाच रंग भरला आहे. आदर्शसोबत हे गाणं गाताना एक वेगळंच समाधान लाभलं. केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर संपूर्ण जग या गाण्याच्या तालावर थिरकणार असल्याचंही हर्षित अभिराज म्हणाले. हे गाणं ‘सर्जा’च्या आकर्षणाचं मुख्य केंद्र ठरणारं असल्याचं अगोदरपासूनच ठाऊक होतं आणि हर्षित अभिराज यांनी त्याच तोलामोलाचं गाणं बनवल्याची भावना दिग्दर्शक धनंजय खंडाळे यांनी व्यक्त केली आहे. ‘धड धड…’ हे गाणं मराठी रसिकांची धड धड वाढवणारं ठरेल आणि संगीतप्रेमी या गाण्यावर भरभरून प्रेम करतील असे निर्माते अमित पाटील यांचे म्हणणे आहे.
अनिल नगरकर, रोहित चव्हाण, तुषार नागरगोजे, ऐश्वर्या भालेराव, आकाश पेटकर, ज्योति शेतसंधी, जगन्नाथ घाडगे, विष्णू केदार, प्रशांत पिसे, बालकलाकार गौरी खंडाळे, कुणाल गायकवाड आदी कलाकारांनी या चित्रपटात अभिनय केला आहे. दिग्दर्शन आणि गीतलेखनासोबतच धनंजय खंडाळे यांनी चित्रपटाची कथा, पटकथा, संवादलेखनही केलं आहे. संगीतासोबतच पार्श्वसंगीतही हर्षित अभिराज यांचं आहे. डिओपी राहुल मोतलिंग यांनी सुरेख सिनेमॅटोग्राफी केली असून, संकलन सुबोध नारकर यांनी केलं आहे. कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी प्रशांत प्रल्हाद शिंदे यांनी सांभाळली असून सुनील लोंढे यांचं कला दिग्दर्शन आहे. १४ एप्रिलला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.