माणूस जन्माला येतो, लहानाचा मोठा होतो. पुढे सुख दुःखाची अनेक वादळे झेलत आयुष्य जगतो. पण.. आयुष्य का जगतो?, कशासाठी जगतो? आणि कुणासाठी जगतो? याची मात्र काहीच कल्पना नसते. पोटाची खळगी भरण्यासाठी आयुष्यभर काबाडकष्ट करतो. पैसा मिळवण्यासाठी कुठेतरी नोकरी करतो, लहान-सहान कामे करतो, अंगमेहनतिचीही कामे करतो. पूर्वी ६०/७० वर्षांचे आयुष्य जगायचा, आता ७०/८० वर्षे जगतो आणि मरून जातो. मेल्यानंतर कुटुंबीय, नातेवाईक चार दिवस रडतात आणि विसरून जातात. मेल्यानंतर पृथ्वीतलावरचं आपलं अस्तित्व मात्र कायमचंच संपुष्टात येतं…आपण कितीही चांगले असलो तरी मेल्यानंतर आपली आठवण ही फक्त १५/२० दिवसांपुरतीच असते… कारण आपण जगलेलो असतो ते केवळ आपल्या कुटुंबापुरतंच. मी, माझं कुटुंब एवढंच जग असतं आपलं..
तर…जगावं तर ते समाजासाठी… तुम्ही जगाच्या कोणत्या समस्या सोडवता? तुम्ही काय उभारता? तुम्ही कुणाच्या तरी कामी येता का? यालाच तुमच करियर म्हणतात. तर तुम्ही स्वतःच्या पलीकडे जाऊन जेव्हा विचार करता त्याला शिक्षण असं म्हणतात… करियर म्हणजे केवळ नोकरी मिळवणं किंवा व्यवसायात प्रगती करणं एवढाच संकुचित विचार नसावा… समाजाचा विचार करून जगणं म्हणजेच आयुष्य होय…
*खूप पैसा, गाडी, बंगला, दागदागिने आहेत म्हणून एखादा माणूस श्रीमंत असतो असं मुळीच नाही. चांगल्या स्वभावाचा, चांगल्या विचारांचा माणूस हाच खरा सर्वात श्रीमंत असतो. पैसा, गाडी, बंगला ही तर केवळ क्षणिक व भौतिक सुखाची साधने आहेत… यातील एकही वस्तू तुम्ही मेल्यानंतर तुमच्या सोबत घेऊन जाऊ शकत नाहीत. सोबत नेता ते तुमचं कर्म, तुमच्याप्रति असलेली समाजाची आपुलकी, आणि वर्षानुवर्षे काढली जाणारी तुमची आठवण हिच आयुष्यभराची कमाई असते.*.
आजवर पैशाने खूप श्रीमंत असणाऱ्या एखाद्या व्यक्तीची आपण आठवण काढतो असं मला तरी वाटत नाही… पण समाजासाठी झटणारे साधुसंत आणि अनेक थोर समाजसेवक आजही आपल्या स्मरणात आहेत. कारण ते जगले होते समाजासाठी. त्यांनी समाजाला काहीतरी दिलं म्हणूनच आजवर त्यांच्या आठवणी जिवंत आहेत. उदाहरण घ्यायचच झाल तर आताच दोन दिवसांपूर्वी आपण ज्यांची पुण्यतिथी साजरी केले ते संत गाडगेबाबा… काय होतं त्यांच्याकडे… *फक्त हातात एक खराटा, डोक्यावर फुटलेल्या मडक्याच खापर आणि अंगावर फाटका सदरा…पैश्याचा तर विषयच नव्हता…चलनाचं एक नाणंसुद्धा खिशात नसायचं*. गाव झाडत फिरायचं आणि एखाद्याने दिलेला भाकर तुकडा खाऊन आयुष्य जगायचं. *पण त्यांनी जगाला अनमोल शिकवण दिली ती स्वच्छतेची आणि अंधश्रद्धा निर्मूलनाची. याच विचारांमुळे आज ते अजरामर झाले.*
आपणही समाजात असं काही करतो का? समाजाला काही देतो का? भले नसेल आपली महती साधुसंतांएवढी कि लोक आपल्याला वर्षानुवर्षे लक्षात ठेवतील. पण निदान एक पिढी तरी लक्षात ठेवेल एवढं कर्तुत्ववान व्हावं प्रत्येकाने
एकमेकांचा राग, द्वेष करत आयुष्य घालवण्यापेक्षा चांगलं रहायला शिका.* ज्या कुटुंबासाठी आज जगतोय आपण, ज्या मुलांना लहानाचं मोठं करतोय…तीच मुलं तुम्हाला म्हातारपणात सांभाळतीलच याची कुठलीही शाश्वती नाही… म्हातारे झाल्यावर आई-बाप काम काहीच काम करत नाहीत म्हणून त्यांना एखाद्या वृद्धाश्रमात नेवून ठेवलं जातं…
बालपणासारखंच तुमचं म्हातारपणही जाईल असंही नाही. बालपणी लाड होतात तर म्हातारपणी हाल-अपेष्टाही सहन कराव्या लागतात. ज्या मुलांसाठी जगलो तीच मुले एका क्षणात परके करून जातील… या सगळ्यानंतर जीवनाच्या शेवटच्या क्षणी प्रश्न पडतो कि आपण आयुष्यभर जगलो ते कुणासाठी?….
समाजासाठी जगा…
*दान-धर्म करा, भुकेल्या माणसांना अन्न द्या. आनंदात जगून घ्या… फिरावंस वाटलं तर भरपूर फिरून घ्या. म्हातारपणी फिरावंस वाटल तरी तुमच शरीर मात्र साथ देणार नाही. येताना एकटे असलो तरी जाताना मात्र सर्वांचे होऊन जाण्यातच खरी मजा आहे…