नवी मुंबई/प्रतिनिधी. NHI
महिला प्रीमियर लीगमध्ये एकाहून एक रंगतदार सामने होत असून आज नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमध्ये या लीगचा १५ सामना सुरु आहे. मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स या मैदानात आमने-सामने उतरले आहेत. मुंबईने आतापर्यंत झालेल्या सर्व पाच सामन्यांमध्ये विजय मिळवून प्ले ऑफमध्ये प्रेवश केला आहे. ५ सामन्यांमध्ये १० गुण प्राप्त करून मुंबई गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. तर यूपी वॉरियर्सने आतापर्यंत झालेल्या ५ सामन्यांपैकी २ सामन्यांवर विजय संपादन केल्याने गुणतालिकेत ते चौथ्या क्रमांकावर आहेत. दरम्यान, आजच्या सामन्यात यूपीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
त्यानंतर मैदानात उतरलेल्या मुंबईच्या फलंदाजांवर यूपीच्या गोलंदाजांनी भेदक मारा केला. यूपीची फिरकीपटू सोफी एल्केस्टोनने पुन्हा एकदा चमकदार कामगिरी केली. मुंबईच्या महत्वाच्या तीन फलंदाजांना बाद करून सोफीने मुंबईच्या धावसंख्येवर ब्रेक लावला. दरम्यान, इजी वॉन्गने १९ चेंडूत नाबाद ३२ धावांची आक्रमक खेळी केली. त्यामुळे मुंबई इंडियन्सने २० षटकांत सर्वबाद १२७ धावा केल्या. यूपीला विजयासाठी १२८ धावांचं लक्ष्य गाठावं लागणार आहे.
मुंबईसाठी कर्णधार हरमनप्रीत कौरने २२ चेंडूत २५ धावा केल्या. सलामीवीर फलंदाज हिली मॅथ्यूजने ३० चेंडूत ३५ धावा कुटल्या. मुंबईच्या इतर फलंदाजांना मोठी धावसंख्या करता आली नाही. यूपीच्या गोलंदाजांनी भेदक मारा केल्याने मुंबईच्या फलंदाजांना फलकावर मोठी धावसंख्या लावता आला नाही. वेगवान गोलंदाज अंजलीने यास्तिका भाटियाला बाद करून एक विकेट घेतला. तर राजेश्वरी गायकवाडने अमेलिया केर आणि हुमैरा काझीला बाद करून दोन विकेट्स मिळवल्या. सोफीने ३ तर दिप्ली शर्माला २ विकेट मिळाली.