MUMBAI/NHI
आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी, आरएमएमएस व आयडियल ग्रुपतर्फे क्रीडाप्रेमी आमदार सचिनभाऊ अहिर चषक आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या फायनलमध्ये लीलावती हॉस्पिटलने धडक दिली. सामनावीर धर्मेश स्वामी व अष्टपैलू रुपेश कोंडाळकर यांच्या आक्रमक खेळामुळे लीलावती हॉस्पिटलने बलाढ्य जे.जे. हॉस्पिटलचा ७ विकेटने पराभव केला. आघाडीच्या फलंदाजांना सूर न सापडल्यामुळे जे.जे. हॉस्पिटल संघाची विजयीदौड रोखली गेली. राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते, उपाध्यक्ष बजरंग चव्हाण, क्रिकेटपटू चंद्रकांत करंगुटकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांनी धडाकेबाज फलंदाज धर्मेश स्वामीला सामनावीर पुरस्काराने गौरविले.
जे.जे.हॉस्पिटलने लीलावती हॉस्पिटल विरुद्ध नाणेफेक जिंकून शिवाजी पार्क-माहीम ज्युवेनाईल खेळपट्टीवर घेतलेला प्रथम फलंदाजीचा निर्णय अनुकूल ठरला नाही. प्रवीण पांचाळ (१८ धावांत ३ बळी), रुपेश कोंडाळकर (१३ धावांत २ बळी) आदी लीलावती हॉस्पिटलच्या सर्व गोलंदाजांनी विकेट घेणारी गोलंदाजी केल्यामुळे जे.जे. हॉस्पिटल संघाला २० षटकात ९ बाद ९१ धावांवर समाधान मानावे लागले. प्रवीण सोळंकी (१५ चेंडूत १८ धावा), अक्षय सावंत (१४ चेंडूत १७ धावा), अभिजित मोरे (२३ चेंडूत १५ धावा), राकेश शेलार (१० चेंडूत १४ धावा) यांनी जे.जे. हॉस्पिटलचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला.
प्रत्युत्तर देतांना लीलावती हॉस्पिटलची सलामी जोडी ३ धावसंख्येवर फुटल्यावर देखील भरवंशाचा सलामीवीर रुपेश कोंडाळकर (१८ चेंडूत ३३ धावा) व तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस उतरलेल्या धर्मेश स्वामी (३१ चेंडूत नाबाद ३६ धावा) यांनी धडाकेबाज फलंदाजी करून दुसऱ्या विकेटसाठी ४८ धावांची भागीदारी केली. परिणामी लीलावती हॉस्पिटलने विजयी लक्ष्य ११.१ षटकात ३ बाद ९४ धावा फटकावून साध्य केले. मनोज जाधव (२५ धावांत २ बळी) व अभिजित मोरे (२१ धावांत १ बळी) यांनी छान गोलंदाजी केली. लीलावती हॉस्पिटलची अंतिम लढत ब्रीच कॅन्डी हॉस्पिटल विरुद्ध होणार आहे.