मुंबई/NHI/प्रतिनिधी
शिवाजी पार्क जिमखानातर्फे टेनिसपटू व संघटक पी.एस. उर्फ दादा खानोलकर स्मृती एसपीजी दुहेरी टेनिस स्पर्धेत आकाश-अमरजित जोडीने बंडू-अस्लम जोडीचा ५-१ असा पराभव करून सलामीचा सामना जिंकला. दुसऱ्या लढतीत अभिजित-रोहिदास जोडीने यश-प्रथमेश जोडीचा ५-० असा फडशा उडविला. दादर-पश्चिम येथील एसपीजी टेनिस कोर्टवर ‘सेक्युरिटी एचक्यू’ कंपनी पुरस्कृत स्पर्धेचे उद्घाटन एसपीजीचे असिस्टंट जनरल सेक्रेटरी सुनील रामचंद्रन, टेनिस सेक्रेटरी योगेश परुळेकर, जनरल मॅनेजर एम.वाय. कानिटकर, टेनिस कोच संजय पटेल यांच्या उपस्थितीत झाले.
ही स्पर्धा टेनिस मार्कर व सहाय्यक प्रशिक्षक यांच्यासाठी मर्यादित असून मुंबई शहर व उपनगरसह ठाणे, पालघर, सोलापूर, नागपूर, अहमदाबाद, बडोदा, हैद्राबाद आदी जिल्ह्यातील १२८ दुहेरी-जोड्या सहभागी झाल्या आहेत. अन्य सामन्यात प्रवीण-संजय जोडीने राहुल-सचिन जोडीवर ५-२ असा, योगी-शिवा जोडीने प्रशांत-सुशांत जोडीवर ५-१ असा तर राजा-दिलीप जोडीने मालेश-गणेश जोडीवर ५-१ अशी मात करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.स्पर्धेतील विजेत्यांसाठी एकूण रु.८०,०००/- रक्कमेचे पुरस्कार आहेत. अंतिम विजेत्यास रोख रुपये वीस हजार व दादा खानोलकर स्मृती चषक तर अंतिम उपविजेत्यास रोख रुपये पंधरा हजार व दादा खानोलकर स्मृती चषक दिला जाणार आहे.