NHI/MUMBAI
नवी मुंबई सानपाडा येथील शिवाई महिला मंडळाच्या वतीने ९ मार्च २०२३ रोजी सौराष्ट्र पटेल सभागृहात महिला दिन व हळदी कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
याप्रसंगी ठाण्याच्या नगरसेविका नंदिनी राजन विचारे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, आपल्या मंडळाच्या वतीने चांगले उपक्रम राबविले जातात, त्याबद्दल मी शुभांगी सूर्याराव व त्यांच्या महिला पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देते. आपल्या चांगल्या कार्यामुळे अनेक महिलांना रोजगाराची संधी मिळाली आहे. आपली एकजूट फार महत्वाची आहे. मी देखील ठाणा येथे दीडशे महिला बचत गट व दोन महिला मंडळे स्थापन करून सरकारी योजनांचा महिलांना फायदा करून दिला आहे. अनेकांना रोजगार मिळवून दिले आहेत. महिला सक्षम होऊन त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजेत. आता २५ महिलांना चार चाकी गाडी चालवण्याचे परवाना मिळून देणार आहे.
नवी मुंबई शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, आपण समाजासाठी व पुढील पिढीसाठी एक चांगलं कार्य करीत आहात, याबद्दल मला अभिमान वाटतो. आज या ठिकाणी महिलांनी चांगले नृत्य केले. त्यामध्ये त्यांची चांगली प्रॅक्टिस आहे, हे एवढं सहज शक्य होत नाही. सानपाडा येथील महिलांची एकजूट आपण कायम ठेवावी. आपणास महिला दिनाच्या व हळदी कुंकाच्या हार्दिक शुभेच्छा.
याप्रसंगी ठाणे जिल्हा महिला संघटक रजनी शिंत्रे, नवी मुंबई शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख मिलिंद सूर्याराव, शिवाई महिला मंडळाच्या अध्यक्षा शुभांगी सूर्याराव, नगरसेविका कोमल वास्कर, इत्यादी मान्यवरांची महिलांना मार्गदर्शनपर भाषणे झाली. सभेचे सूत्रसंचालन सौ. सुरेखा फडतरे आणि सौ.रंजना पन्हाळे यांनी केले. सुरुवातीला पाहुण्यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी पाच कुशल महिलांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमास नगरसेवक सोमनाथ वास्कर, शाखाप्रमुख अजय पवार ,बाबाजी इंदोरे, उपविभाग प्रमुख चांदभाई, कार्यकर्ते कुरळे, श्यामराव मोरे, प्रविण कांबळे, पोर्ट ट्रस्ट कामगार अंकाचे कार्यकारी संपादक मारुती विश्वासराव आदी मान्यवर उपस्थित होते. शिवाई महिला मंडळाच्या अध्यक्षा शुभांगी सुर्याराव, उपाध्यक्षा सुरेखा शिंगाडे, सचिव वैभवी पांचाळ व इतर महिला पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. सभागृह महिलांनी तुडुंब भरले होते.