मुंबई : प्रतिनिधी NHI
आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी, आरएमएमएस व आयडियल ग्रुपतर्फे क्रीडाप्रेमी आमदार सचिनभाऊ चषक आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धा १० मार्चपासून शिवाजी पार्क येथील माहीम ज्युवेनाईल खेळपट्टीवर सुरु होत आहे. उद्घाटनीय लढत शुक्रवारी सकाळी ९.३० वा. ब्रीच कॅन्डी हॉस्पिटल विरुद्ध कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल-नवी मुंबई यामध्ये राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते व एमबी युनियनचे सेक्रेटरी धर्मेश नाडकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल. पहिल्या चार विजेत्या-उपविजेत्यांना आकर्षक चषक व खेळाडूंना सन्मानपदक, सामनावीर तसेच प्रत्यके संघातील उत्कृष्ट खेळाडूंना विशेष पुरस्काराने गौरविण्यात येणार असल्याचे संयोजक लीलाधर चव्हाण यांनी सांगितले.
प्रतिष्ठेचा आमदार सचिनभाऊ चषक पटकाविण्यासाठी लीलावती हॉस्पिटलचे रुपेश कोंडाळकर, मनोहर पाटेकर, धर्मेश स्वामी; जे.जे. हॉस्पिटलचे नरेश शिवतरकर, रोहन म्हापणकर: रहेजा हॉस्पिटलचे चेतन सुर्वे, अविनाश डांगळे; कस्तुरबा हॉस्पिटलचे डॉ. परमेश्वर मुंडे, अंकुश जाधव; सायन हॉस्पिटलचे संभाजी थोरात, निलेश चव्हाण; ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलचे प्रदीप क्षीरसागर, रोहन महाडिक; सेव्हन हिल्स हॉस्पिटलचे हर्षद जाधव; केडीए हॉस्पिटलचे संदीप देशमुख, मिल्टन लोबो आदींच्या खेळावर भिस्त राहण्याची शक्यता आहे. परिणामी रुग्णालयीन संघांमधील चुरशीचे सामने क्रिकेट शौकिनांना २० मार्चपर्यंत पाहण्यास मिळतील. कामगार विभागातील नवोदित व उदयोन्मुख खेळाडूंना विविध क्रीडा प्रकारात सातत्याने प्रोत्साहन देण्यासाठी कामगार नेते आमदार सचिनभाऊ अहिर हे कार्यरत असल्यामुळे त्यांच्या ५१ व्या वाढदिवसानिमित्त यंदाही स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.