प्रतिनिधी/ NHI
मुंबई : शेवटच्या षटकात विजयासाठी ५ धावांचे आव्हान वाशी वॉरीयर्सच्या आठव्या व नवव्या जोडीला पेलवता न आल्यामुळे मीरा-भाईंदर लायन्सने एका धावेने सनसनाटी विजय मिळविला आणि माझगाव क्रिकेट क्लब आयोजित पहिल्या नवी मुंबई प्रीमियर लीग-एनएमपीएल क्रिकेट स्पर्धेमध्ये मीरा-भाईंदर लायन्सने पहिल्या पराभवानंतर लागोपाठ दुसरा साखळी सामना जिंकला. विसाव्या हाणामारीच्या षटकात प्रतिस्पर्ध्याचे तीन विकेट बाकी असतांना केवळ ३ धावा देत एक बळी घेणारा मीरा-भाईंदर संघाचा मध्यमगती गोलंदाज अमित पांडे अखेर लायन ठरला. अर्धशतकवीर ऋग्वेद मोरेला सामनावीर पुरस्काराने पालघरचे कलेक्टर गोविंद बोडके यांनी गौरविले. यावेळी अरुणाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे सेक्रेटरी नाबम विवेक, एनएमपीएलचे चेअरमन शाह आलम शेख, प्रदीप कासलीवाल, अभिजित घोष आदी उपस्थित होते.
दादोजी कोंडदेव स्टेडीयमवर वाशी वॉरियर्सने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा घेतलेला निर्णय पहिल्याच चेंडूवर अनुकूल ठरला. मीरा-भाईंदर लायन्सचे खाते उघडण्यापूर्वी भरवंशाचा सलामीवीर सृजन आठवलेचा अतुल मोरेने सलामीलाच त्रिफळा उडविला. तरीही ऋग्वेद मोरेने (६२ चेंडूत ५९ धावा) एका बाजूने किल्ला लढवीत २ षटकार व ३ चौकारांची आतषबाजी केली आणि मीरा-भाईंदर लायन्सला २० षटकात आव्हानात्मक ८ बाद ११२ धावांचा पल्ला गाठून दिला. हार्दिक कारंगले (१३ धावांत २ बळी), धृमील मटकर (२३ धावांत २ बळी), पृथ्वीक पंडित (१२ धावांत २ बळी) यांनी छान गोलंदाजी केली.
विजयी लक्ष्याचा पाठलाग करतांना जयदीप परदेशी (२६ चेंडूत २८ धावा) व जितेश राऊत (४६ चेंडूत ४० धावा) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ६२ धावांची भागीदारी केल्यामुळे वाशी वॉरीयर्समध्ये विजयी वारे वाहू लागले. परंतु अमित पांडे (२३ धावांत २ बळी), पार्थ चंदन (१७ धावांत २ बळी) यांच्यासह इतर तीन गोलंदाजांनी किफायतशीर विकेट घेणारी गोलंदाजी करून १९ व्या षटकाअखेर वाशी वॉरीयर्सची ७ बाद १०८ धावा अशी स्थिती निर्माण केली. शेवटच्या षटकात मात्र अमित पांडेच्या गोलंदाजीने कमाल केली. त्याने तिसऱ्या चेंडूवर विकेट व षटकात केवळ ३ धावा देऊन वाशी वॉरीयर्सला ८ बाद १११ धावसंख्येवर रोखले आणि मीरा-भाईंदर लायन्सला एका धावेने मौलिक विजय मिळवून दिला.