बॉर्डर गावसकर मालिकेतील पहिले तीन सामने पार पडले आहेत. तिसरा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला असून भारत मालिकेत २-१ ने आघाडीवर आहे.
India vs Australia 3rd Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चार सामन्यांची बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धा खेळली जात आहे. या मालिकेतील आतापर्यंत तीन सामने पार पडले आहे. मालिकेतील पहिले दोन सामने भारताने जिंकले. त्याचबरोबर मालिकेतील तिसरा सामना स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलिया संघाने जिंकला. स्टीव्ह स्मिथने ऑस्ट्रेलियाला तिसरा सामना जिंकून एक मोठा विक्रम नावावर केला आहे.
पहिल्या दोन कसोटीत पॅट कमिन्सला जे जमले नाही ते स्टीव्ह स्मिथने तिसऱ्या कसोटीत केले. स्मिथच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने पुन्हा एकदा टीम इंडियाला त्यांच्या घरच्या मैदानावर कसोटी सामन्यात पराभूत केले. या विजयासह स्मिथच्या नावावर मोठा विक्रम झाला आहे. २०१० नंतर मायदेशात भारताला दोन कसोटीत पराभूत करणारा तो दुसरा कर्णधार ठरला. त्याच्या आधी हा विक्रम इंग्लंडचा माजी कर्णधार अॅलिस्टर कुकच्या नावावर होता.
स्मिथच्या नेतृत्वाखाली दोन कसोटी जिंकल्या –
स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने २०१० पासून मायदेशात दोन कसोटी सामन्यांमध्ये टीम इंडियाचा पराभव केला आहे. २०१७ मध्ये, पुणे येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामन्यात स्टीव्ह स्मिथने कर्णधार म्हणून आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. यानंतर आता इंदूरमध्ये स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाला दुसऱ्यांदा कसोटी जिंकण्यात यश आले आहे. अशा स्थितीत पाहिले तर तो सध्याच्या काळात ऑस्ट्रेलियाचा सर्वात यशस्वी कर्णधार मानला जात आहे.
१० वर्षात भारताचा मायदेशात तिसरा पराभव –
गेल्या १० वर्षात टीम इंडियाला घरच्या मैदानावर केवळ 3 कसोटी सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हेच संघ भारताला मायदेशात पराभूत करणारे आहेत. यापूर्वी २०१२ मध्ये अॅलिस्टर कुकच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने मुंबई आणि कोलकाता कसोटीत भारताचा पराभव केला होता.
भारताचा तीन वेळा पराभव –
२०१७ मध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभूत (कर्णधार स्टीव्ह स्मिथ)
२०२१ मध्ये इंग्लंडकडून पराभूत (कर्णधार जो रूट)
२०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभूत (कर्णधार स्टीव्ह स्मिथ)
मालिकेत भारत २-१ ने आघाडीवर –
इंदोर कसोटीत भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले असले, तरी टीम इंडिया अजूनही मालिकेत २-१ ने आघाडीवर आहे. अशा परिस्थितीत जागतिक कसोटी चॅम्पियनशिप अंतिम फेरी गाठण्यासाठी आणि मालिका जिंकण्यासाठी भारताला ९ मार्चपासून अहमदाबाद येथे सुरू होणारी चौथी कसोटी जिंकावी लागेल.