महाराष्ट्रालाच नाही तर देशाला सुपरिचित असलेले नाव म्हणजे राज ठाकरे. मात्र, राज ठाकरे यांचे खरे नाव स्वरराज ठाकरे आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच आपल्याला राज ठाकरे अशा नावाने करिअरला सुरूवात कर, असा सल्ला दिला होता. अशी आठवण राज ठाकरे यांनी सांगितली. ‘वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट’ व्हिजेटीआय कॉलेजमध्ये एका कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित होते. यावेळी राज ठाकरे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची मनमोकळी उत्तरे दिली. यावेळी राज ठाकरे यांनी आपल्या नावाचा किस्साही विद्यार्थ्यांना ऐकवला.
स्वरराज या नावानेच मी व्यंगचित्र करायचो. एके दिवशी बाळासाहेबांनी बोलावले. आणि मला म्हणाले की, ‘माझ्या करीयरची सुरुवात मी बाळ ठाकरे या नावाने केली. आजपासून तू राज ठाकरे या नावाने कर. तेव्हापासून माझे नाव राज ठाकरे झाले, असा किस्सा त्यांनी सांगितला.
माझा राग वडिलांना कळाला असेल
माझे वडील संगीतकार होते. माझ्या वडिलांकडे मोहम्मद रफी साहेबांनी जवळपास 14 गाणी मराठीत गायलेली आहेत. मी संगीतात काही तरी करावे अशी माझ्या वडिलांची देखील इच्छा होती. त्यामुळे त्यांनी माझे नाव स्वरराज असे ठेवले होते. माझ्या आईचं नाव देखील लग्नात मधुवंती ठेवले होते. मधुवंती हा हसंगितामधील एक राग आहे. माझ्या बहिणीचे नाव जयजयवंती ठेवले. जयजयवंती हा सुद्धा एक राग आहे. नंतर कालांतराने माझा राग त्यांना कळला. अशा मिश्किल शब्दात त्यांनी नावाचा किस्सा सांगितला.
जातीपातीच्या राजकारणात अडकू नका
छत्रपती शिवाजी महाराजांना हार घालण्यापुरते मर्यादित ठेवू नका. ज्या ज्या वयात जे जे करायचं ते करा. पण आपण मराठी आहोत. आपण हिंदू आहोत हे विसरू नका, असा सल्ला राज ठाकरे यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला. जातीपातीच्या राजकारणात अडकू नका, असा महत्त्वाचा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
माझे पहिले भाषण बाळासाहेबांनी ऐकले
राज ठाकरे यांनी केलेल्या पाहिल्या भाषणाचा किस्सा देखील राज ठाकरे यांनी सांगितला. त्या वेळी मी एक मोर्चा काढला होता. मोर्चा संपल्यानंतर मी एक भाषण केले. तेव्हा कोणितरी मला सांगितले की, माँ आल्या आहेत. माँ म्हणजे मीनाताई ठाकरे आल्या होत्या. त्या मागे गाडीत बसल्या होत्या. त्या भाषण ऐकायला आल्या होत्या. मी त्यांना भेटलो. त्यांनी सांगितले काकांनी बोलावले, चल भेटायला. रात्रीचे दोन अडीच वाजले होते. साहेबांनी फोनवर माझे भाषण ऐकले असल्याचे मला समजले. कोणी तरी पानटरीतून फोन लावून दिला होता.
भाषण कसे करायचे हे बाळासाहेबांनी सांगितले
बाळासाहेबांनी त्या वेळी मला भाषण कसे करावे, हे सांगितले. ते म्हणाले की, ‘माझ्या बापाने जे सांगितलं ते तुला सांगतो. काही नियम सांगतो. जे मैदान असेल त्याची भाषा बोल. कसे बोललो ते महत्त्वाचे नाही. समोरच्या लोकांना काय खुराक दिला हे बघ. आपण किती शहाणे आहोत हे सांगण्याचा प्रयत्न करू नको. लोक कसे शहाणे होतील याचा विचार कर.’ त्यानुसारच मी भाषण करत असतो, असे राज ठाकरे यांनी सांगितले.