जेव्हा जेव्हा मी कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन घेतले तेव्हा तेव्हा भाजपला यश मिळालेले आहे. असे म्हणत अमित शहा यांनी आगामी निवडणुका भाजप आणि शिवसेना एकत्रित लढणार असल्याची घोषणा कोल्हापूरात केली. यावेळी त्यांनी ‘मिशन इलेक्शन’ला अप्रत्यक्षपणे सुरुवात करत असल्याचे सांगितले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. त्यानंतर अमित शहा यांनी भाजप विजय संकल्प सभेस संबोधित केले. यावेळी ते बोलत होते.
अमित शहा म्हणाले, 2024 च्या निवडणुक अभियानासाठी मी याठिकाणी आलेलो आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपचा विजय म्हणजे समृद्ध भारताची रचना होय. आता महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना एकत्रित लढतील तर उरलेसुरले त्यांच्या विरोधात एकत्र लढतील.
आंबेडकर आपल्याविरुद्ध लढणार
अमित शहा म्हणाले, महाविकास आघाडीतील तीन पक्षांसह प्रकाश आंबेडकर आपल्याविरुद्ध लढणार आहे. मात्र पुढची निवडणूक भाजपचे सरकार स्थापन करण्यासाठी नाही, पुढची निवडणूक मोदींना पंतप्रधान बनविण्यासाठी नाही. तर 2024 ची निवडणूक महान भारताच्या रचनेसाठी आणि समृद्ध भारत बनवण्यासाठी आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पत्नी सोनल शहा यांच्यासह अंबाबाई मंदीरात कुंकूमार्चन पूजा केली. तसेच ‘आई अंबाबाई, सर्वांना सुख, समृध्दी दे!’ अशी प्रार्थना त्यांनी केली. यावेळी मंत्री दीपक केसरकर, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने यांची उपस्थिती होती.
भाजपचा विजय नक्की
2024 मध्ये भाजपचा विजय नक्की होणार, असा विश्वास अमित शहा यांनी व्यक्त केला. पुढे शहा म्हणाले, दहशतवादावर लढण्याची काँग्रेसच्या काळात कोणामध्ये हिम्मत नव्हती. काँग्रेस सरकारमध्ये पंतप्रधानांना कुणी विचारत नव्हते. या 9 वर्षांच्या कालावधीत 9 करोड गरिब महिलांना गॅस सिलिंडर मिळाले. 70 वर्षांनंतर धूरमुक्त वातावरणात त्या महिला श्वास घेत आहेत.
पाकिस्तान भारतात घुसखोरी करत असे
अमित शहा म्हणाले, 2004 ते 2014 पर्यंतच्या काळात कोणाही पंतप्रधानांना पंतप्रधान मानत नव्हते. सगळे स्वत:लाच पंतप्रधान समजायचे. दररोज भ्रष्टाचाराच्या बातम्या येत होत्या. सरकार चालवणाऱ्यांना कळत नव्हते की, कोण आज आपल्या डोक्यात टपली मारेल. दररोज पाकिस्तान भारतात घुसखोरी करत होते. पाकिस्तानविरुद्ध भूमिका घेण्याची कोणाची हिंमत नव्हती
काँग्रेस-राष्ट्रवादीचा होता विरोध
अमित शहा म्हणाले, पंतप्रधान मोदी यांनी घरोघरी शौचालय, वीज पोहोचवली. मोदी यांनी 2019 मध्ये रामजन्मभूमीचा पाया ठेवला. मोदी यांनी ट्रिपल तलाक कायदा रद्द केला, याबाबत कधी विचार केला होता का? असा सवाल अमित शहांनी उपस्थित केला. कलम 370 मोदींनी रद्द केला. शरद पवार यांची राष्ट्रवादी, राहुल बाबांची काँग्रेस, ममता-समता, सपाचा 370 कलम हटवण्याला विरोध होता.
अर्थव्यवस्था आज 5 व्या क्रमांकावर
अमित शहा म्हणाले, संपूर्ण 70 वर्षांचे काम नरेंद्र मोदी यांनी 7 वर्षात पूर्ण केले. अटलबिहारी वाजपेयी यांनी अर्थव्यवस्थेला 11 व्या क्रमांकावर आणले. तर मनमोहन सिंग यापुढे जाऊ शकले नाही. मोदी यांनी याच अर्थव्यवस्थेला 5 व्या क्रमांकावर आणले.
शरद पवारांच्या पायात पडले
अमित शहा म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत युती असताना प्रचारासाठी मोदी यांचे मोठे फोटो लावले. तर स्वतःचे छोटे फोटो लावले. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात निवडणुका लढल्या. निवडणुकीनंतर यांच्या तोंडाला पाणी सुटले. आणि ठाकरे शरद पवारांच्या पायात जाऊन पडले. आम्हाला सत्तेचा लोभ नव्हता.
महान भारताची रचना
अमित शहा म्हणाले, आपल्याला बहुमत नाही तर संपूर्ण विजय हवाय. 48 च्या 48 जागा जिंकायच्या आहेत, असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात महान भारताची रचना करायची आहे. ज्यांनी धोका दिलाय त्यांना धडा शिकवू.