शिवनेरी : छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्रासाठीच आदर्श नव्हते तर ते संपूर्ण देशासाठी आणि समाजासाठी आदर्श आहेत. ज्या आग्र्यातील किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला बानेदारपणे उत्तर दिले, तोच दिवान-ए- आम यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करणार आहे. ही आपल्या सर्वांसाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. शिवनेरी गडावर आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
शिवनेरी महाराष्ट्राचे नव्हे तर जगाचे श्रद्धास्थान
राज्याच्या पर्यटन विभागाच्या वतीने आयोजित केलेला जन्मोत्सव सोहळा आनंदाचा आणि अभिमानाचा सोहळा आहे. शिवनेरी हे केवळ महाराष्ट्राचेच नाही तर जगाचे श्रद्धास्थान असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.
शिवप्रभुचे दर्शन घेण्यासाठी कोणालाही बंदी नाही
संभाजीराजे छत्रपती यांनी या सूचना केल्या त्या सर्व पूर्ण होतील, असे आश्वासन देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजेच शिवप्रभुंचे दर्शन घेण्यासाठी कोणालाही बंदी असता कामा नये आणि ती नसणार आहे, अशी घोषणा देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा राज्याचा मुख्यमंत्री
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे आपण सर्व पाईक आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा राज्याचा मुख्यमंत्री झाला आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी केलेल्या सर्व सूचना या जनतेच्या हिताच्या आहेत, त्यामुळे आपण ज्याप्रमाणे रायगडासाठी पुढाकार घेतला त्याचप्रमाणे शिवनेरीसाठी देखील पुढाकार घ्यावा आणि विकासाची कामे मार्गी लावण्यात हातभार लावावा, हा इतिहास ही आपली संपत्ती आहे, तो जपण्याचा आणि संवर्धन करण्याचे काम राज्य सरकारचे आहे. आपण सूचना करा, त्या सूचनांची सर्वांसोबत चर्चा करुन अंमलबजावणी केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
शिवनेरी ही पवित्र आणि पावन भूमी आहे. तिथे आल्यानंतर आपल्याला शिवरायांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाची अनुभूती मिळते, आणि मनोमन आपण नतमस्तक होतो. या परिसराचा विकास आणि आराखडा वेळेत पूर्ण होईल यासाठी सरकारचा सर्वतोपरी प्रयत्न असेल, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.