जग्गु आणि ज्युलिएटची हटके Lovestory
Cast and Crew Cast
अमेय वाघ, वैदेही परशुरामी, प्रविण तरडे, उपेंद्र लिमये, मनोज जोशी, समीर धर्माधिकारी, अविनाश नारकर, सविता मालपेकर
अंगद म्हसकर, अभिज्ञा भावे, समीर चौघुले, केयुरी शाह, सुनिल अभ्यंकर, रेणुका दफ्तरदार, जयवंत वाडकर
Crew
निर्माते – पुनित बालन स्टुडिओज्, दिग्दर्शन व छायांकन – महेश लिमये, कथा, पटकथा – महेश लिमये, अंबर हडप, गणेश पंडित
संवाद – अंबर हडप, गणेश पंडित, संगीत – अजय-अतुल, गीते – गुरू ठाकूर, अजय-अतुल, संकलन – जयंत जठार
मार्केटिंग –विनोद सातव, साऊंड डिझाईन – अनमोल भावे, कला दिग्दर्शन – एकनाथ कदम, वेशभूषा – मानसी अत्तर्डे
पार्श्वसंगीत – विजय गावंडे, कार्यकारी निर्माता – जितेंद्र कुलकर्णी, लाईन प्रॉड्युसर – ओंकार हर्डिकर
इपी – अनुप गोरे (पुनित बालन स्टुडिओज्)
प्रत्येक प्रेमाच्या वेगवेगळ्या व्याख्या असतात. व्यक्तीनुसार त्या बदलतात. अशाच काही व्याख्या दिग्दर्शक महेश लिमये यांनी ‘जग्गू आणि ज्युलिएट’ या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. जग्गू आणि ज्युलिएट या चित्रपटाची सुरुवात ही देवभूमीमधून होते. उत्तराखंडला आलेल्या योगा टूरमधील काही जोडप्यांमधून तर एकट्या आलेल्या इसामाकडून सप्तरंगी प्रेमाची व्याख्या कळते. तसेच आई नसलेल्या मुलांचे त्यांच्या वडिलांसोबत नाते कसे असते हे दाखवण्याचा प्रयत्न महेश लिमये यांनी चित्रपटात केला आहे.
कथानक थोडक्यात – मुंबईच्या वर्सोवा कोळीवाड्याचा जग्गू ( अमेय वाघ). दिलखूलास आणि आयुष्यावर मनापासून प्रेम करणारा. जग्गूचे तितकेच प्रेम आहे त्याच्या वडिलांवर म्हणजे तात्या (उपेंद्र लिमये) वर आणि तात्याचा सुद्धा जग्गू हा जीव की प्राण. जग्गू आलाय उत्तराखंड फिरायला एका ग्रुप टूरसोबत आणि जमलंच तर आपल्या स्वप्नातील राजकुमारीचा पण शोध जग्गू ला घ्यायचा असतो. पण ग्रुपमध्ये असलेले सर्व ज्येष्ठ मंडळी पाहून जग्गू टूर मॅनेजर पॅट्रिक (ह्रिषीकेश जोशी) च्या परवानगीने एकटाच उत्तराखंड फिरायला निघतो. हातात वेळ असतो केवळ ५ दिवसांचा. पहिल्याच दिवशी त्याची भेट होते अमेरिकेहून आलेल्या ज्युलिएट (वैदेही परशुरामी) सोबत. जग्गू जितका मोकळा तितकीच ज्युलिएट राखीव. दोघांमध्ये एक समानता म्हणजे दोघांची आई त्यांच्या लहानपणीच वारली असते. पण जग्गू च्या अगदी विरुद्ध असलेली ज्युलिएट स्वतःच्या वडिलांचा तिरस्कार करीत असते. उत्तराखंड मध्ये जुलिएटची आई ज्या ज्या ठिकाणी येऊन गेलेली असते ती सगळी स्थळे ज्युलिएटला बघायची असतात आणि त्यासाठी ती जग्गू ची मदत घेते. जग्गूचे पहिल्याच भेटीत ज्युलिएट वर प्रेम बसते आणि तो ज्युलिएटसमोर स्वतःच्या प्रेमाची कबुलीसुद्धा देतो. मला येत्या ४ दिवसात तू इम्प्रेस करू शकलास तर मी तुझा विचार करेन असे आवाहन ज्युलिएट जग्गूला देते आणि जग्गू ते स्वीकारतो. ज्युलिएट ने दिलेले हे आवाहन जग्गू कसे पूर्ण करतो हा पुढील कथाभाग.
चित्रपटाच्या नावावरुन चित्रपटाची कथा ही केवळ जग्गू आणि ज्युलिएटची आहे असे वाटेल. पण ती त्या दोघांपूरताच मर्यादीत नसून योगा टूरला आलेल्या इतर कपलचीही दाखवण्यात आली आहे. तसेच घटस्फोटानंतर एकट्या राहणाऱ्या लोकांचा जगण्याचा दृष्टीकोनही यामध्ये दाखवण्यात आला आहे. जग्गू उत्तराखंडला आलेल्या टूरमध्ये मिस्टर-मिसेस गुप्ते म्हणेज अंगद मस्कर आणि अभिज्ञा भावे हे घटस्फोट घेण्याच्या उंठबरठ्यावर असलेले जोडपं आहे. तसेच सोशल मीडियावर सतत रमणारे मिस्टर आणि मिसेस निमकर म्हणेज समीर चौघुले-केयुरी शाह आहेत. तिसरं एक जोडपं आहे ज्यांना मुलं होत नाहीये जे साकारले आहे अविनाश नारकर- सविता मालपेकर यांनी. घटस्फोटीत मदन शृंगारपुरे म्हणजेच समीर धर्माधिकारी देखील आहे. ही सर्व जोडपी चित्रपटात प्रेमाच्या वेगवेगळ्या व्याख्या सांगतात. या सगळ्या जोडप्यांच्या कथा या प्रेक्षकांना अगदी आपल्याशा वाटणाऱ्या आहेत. चित्रपटातील अविवाहीत प्रविण तरडे यांची हटके भूमिका प्रेक्षकांना नक्की आवडेल.
जग्गू या चित्रपटात ‘ती’च्या शोधात असतो. अखेर त्याला उत्तराखंडमध्ये ती सापडते. विल्यम शेक्सपिअरच्या ‘रोमियो-ज्युलिएट’ या पात्रांचा आधार घेत चित्रपटाची कथा फुलवण्याचा प्रयत्न केला आहे. जग्गूच्या आयुष्यात आलेली जुलि नंतर एकत्र येतात की त्यांचे पुढे काय होते? हे तुम्हाला चित्रपटात पाहायला मिळेल. चित्रपटातील जमेची बाजू म्हणजे देवभूमितील अनेक ठिकाणी केलेले चित्रीकरण. प्रेक्षकांची चित्रपट पाहाताना उत्तराखंडाची टूर नक्की होईल. तसेच चित्रपटातील अजय-अतुलच्या गाण्याने या लव्हस्टोरीमध्ये रंग भरण्याचा प्रयत्न केला आहे.
अमेय वाघने जग्गू हे पात्र अप्रतिम साकराले आहे. त्याच्या तोंडून निघणारी कोळी भाषा प्रेक्षकांची मने जिंकते. तर दुसरीकडे अमेरिकेत लहानाची मोठी झालेली जुलिच्या तोंडून येणारी मराठी भाषा न पटणारी पण त्यातल्यात जमून जाते.