‘COW HUG DAY’ च्या निमित्ताने नेटकरी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत मोदी सरकारला ट्रोल करत आहेत.
जगभरात १४ फेब्रुवारी हा दिवस ‘व्हॅलेंटाईन डे’ अर्थात ‘प्रेमदिवस’ म्हणून साजरा केला जातो. पण केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय मंत्रालयाने हा दिवस ‘काऊ हग डे’ म्हणजेच हा दिवस गायीला मिठी मारून साजरा करावा, असं आवाहन केलं आहे. त्यासाठी एक परिपत्रकही जारी केलं आहे.
याच पार्श्वभूमीवर भाजपा खासदाराचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ‘COW HUG DAY’ च्या निमित्ताने नेटकरी सोशल मीडियात हा व्हिडीओ शेअर करत असून मोदी सरकारला उपरोधिक चिमटे काढत आहेत.
संबंधित व्हिडीओत भाजप खासदार जीव्हीएल नरसिंह राव हे काही नेते आणि समर्थकांसह दिसत आहेत. हा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. संबंधित नेते आणि कार्यकर्ते गायीजवळ जाताच गाईने त्यांना लाथ मारायला सुरुवात केली. हा व्हिडीओ शेअर करत नेटकरी ‘काऊ हग डे’वरून भारतीय जनता पार्टीला ट्रोल करत आहेत. संबंधित नेते गायीची पूजा करण्यासाठी गेले होते, पण गायीने लाथ मारायला सुरुवात करताच भाजपा नेते घाबरून गायीपासून दूर पळताना व्हिडीओत दिसत आहेत.