नाशिक, अमरावती पदवीधर आणि औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीच्या निकालावर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. यापैकी कोकणातील निकाल समोर आला आहे. यामध्ये भाजपने बाजी मारली आहे. भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी झाले असून शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील यांना धक्का बसला आहे. असा एकाबाजूला धुरळा उडाला असला तरी दुसऱ्या बाजूला निकाल काही तासांवरच असताना नाशिक पदवीधर मतदारसंघाचे सत्यजित तांबे यांना मोठा धक्का बसला आहे.
नाशिक पदवीधर मतदारसंघातील मतमोजणी सुरू असतानाच सत्यजित तांबेंवर दुःखाच डोंगर कोसळला आहे. या निवडणुकीसाठी प्रचाराची धुरा सांभाळलेला खांदा आणि त्यांचा जीवलग मित्र मानस पगार यांचे अपघाती निधन झाले आहे. बुधवारी मानस पगार यांचे निधन झाले असून याबाबतची माहिती सत्यजित तांबे यांनी ट्वीट करून दिली. युवा काँग्रेसचे जिल्ह्याध्यक्ष मानस पगार होते.
माहितीनुसार, मतमोजणी असल्यामुळे मानस पगार हे काही मित्रांसोबत नाशिककडे जात असताना हा अपघात झाला. यामध्ये मानस हे गंभीर झाले आणि त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण डॉक्टरांनी त्यांच्या मृत्यू झाल्याची माहिती दिली. दरम्यान या अपघातातील जखमी झालेल्या इतरांवर सध्या उपचार सुरू आहेत.