नागपूर शिक्षक मतदारसंघात म्हणजेच भाजपच्या बालेकिल्ल्यात महाविकास आघाडी जिंकली आहे. नागपुरात मविआच्या सुधाकर आडबाले यांना भरघोस मतांनी विजयी घोषित केलं आहे. तर भाजपच्या मातृसंस्थेच्या बालेकिल्ल्यात नागो गाणारांचा पराभव झाला आहे. त्यामुळे नागपुरात मविआच्या नेत्यांचा जल्लोष सुरू झाला आहे. काँग्रेस नेत्यांकडून पेढे भरवत सुधाकर आडबालेंचं अभिनंदन केलं आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना शह देत सुनील केदार आणि विजय वडेट्टीवार यांनी रेटलेल्या सुधाकर आडबाले यांच्या विजयी वाटचालीनंतर नागपूरमध्ये नाना पटोले गट बॅकफूटवर गेला आहे. नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या वेळी छोटू भोयर यांच्या संदर्भात झालेली नाचक्की टाळण्यासाठी स्थानिक काँग्रेसी नेत्यांनी शिक्षक निवडणुकीत दबाव गट तयार केला होता. त्याच दबाव गटामुळे सुधाकर अडबाले यांच्या विजय दृष्टीपथात आल्याचं बोललं जातं आहे.
माहितीनुसार, नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मविआचे सुधाकर आडबाले यांना १६ हजार ५०० मतं मिळाली असून भाजपचे नागो गाणार यांना ६ हजार ३६६ मतं मिळाली आहेत. नागो गाणार यांना आडबालेंना मिळालेल्या मतांच्या निम्मी मतं ही मिळाली नाहीत. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना त्यांच्याच गृह जिल्ह्यात धक्का बसला आहे. गेले दोन टर्म नागपुराचा मतदारसंघ भाजप समर्थित शिक्षक परिषदेचे आमदार नागो गाणार यांच्या ताब्यात होता. परंतु मविआनं या मतदारसंघात संपूर्ण ताकद पणाला लावून विजय मिळवला आहे. या निकालावर जुन्या पेन्शन योजनेचा सर्वाधिक परिणाम झाल्याचं बोललं जात आहे.