मुंबई : मुलांमध्ये नंदादगोरेगाव व मुलींमध्ये न्यू इंग्लिश स्कूल-वांद्रे संघांनी अमर हिंद मंडळ, दादर आयोजित आंतर शालेय खोखो स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. नंदादीप विद्यालयाने मॉर्डन इंग्लिश स्कूलचा एका डावासह ६ गुणांनी तर न्यू इंग्लिश स्कूलने पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा एका डावासह १० गुणांनी पराभव करून अजिंक्यपदाला गवसणी घातली. शालेय स्पर्धेतील मुलांमध्ये प्रणीत सोगमने सर्वोत्तम अष्टपैलूचा, विघ्नेश कोरेने उत्कृष्ट संरक्षकाचा, चिन्मय पाटीलने उत्कृष्ट आक्रमकाचा तर मुलींमध्ये साक्षी पार्सेकरने सर्वोत्तम अष्टपैलूचा, दर्शिता शर्माने उत्कृष्ट संरक्षकाचा, धानी रोळेकरने उत्कृष्ट आक्रमकाचा पुरस्कार मिळविला. शालेय लंगडी स्पर्धेत मॉर्डन इंग्लिश स्कूल, नंदादीप विद्यालय, गणेश विद्यालय संघांनी विजयी प्रारंभ केला. स्पर्धेचे संपूर्ण छायाचित्रीकरण फेसबुक व यु ट्यूबवर डी-फोकसतर्फे करण्यात आले आहे.
प्रणीत सोगम (३:३० मि., ३:५० मि. व ३ गडी) व अंकुश झोरे (३:०० मि., २:०० मि.) यांच्या हुलकावणीसह दमदार खेळामुळे नंदादीप विद्यालयाने मॉर्डन इंग्लिश स्कूलचे अंतिम आव्हान एक डाव राखून ११-५ असे संपुष्टात आणले. विघ्नेश कोरे (२:०० मि., १:४० मि.) व वेदांत नागवेकर (१:१० मि., १:२० मि.) यांनी शर्थीचे प्रयत्न करूनही मॉर्डन इंग्लिश स्कूलला अंतिम उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. मुलींचे अजिंक्यपद पटकाविताना न्यू इंग्लिश स्कूलने पीपल्स एज्युकेशन सोसायटी शाळेवर एक डाव राखून १७-७ असा विजय मिळविला. विजयी संघातर्फे साक्षी पार्सेकर (३:५० मि., ६ गडी), धानी रोळेकर (२:०० मि., ४.२० मि. व ४ गडी), वैष्णवी जाधव (३ गडी) तर पराभूत संघातर्फे दर्शिता शर्मा (१:२० मि., १:०० मि.), सलोनी सावंत (४ गडी) चमकल्या.
शालेय लंगडी स्पर्धेत मॉर्डन इंग्लिश स्कूलने पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा १९-२ असा, नंदादीप विद्यालयाने ताराबाई मोडक स्कूलचा २१-११ असा तर गणेश विद्यालयाने साने गुरुजी विद्यालयाचा २६-९ असा पराभव करून सलामीचा सामना जिंकला. लंगडी स्पर्धेचे उद्घाटन राष्ट्रीय खेळाडू शिल्पा तोरणे हिच्या हस्ते झाले. खोखो स्पर्धा विजेत्यांना शिवछत्रपती पुरस्कार विजेते मनोहर साळवी, अध्यक्ष भास्कर सावंत, कार्याध्यक्ष दत्तात्रय सावंत, विश्वस्त अरुण देशपांडे, कार्योपाध्यक्ष विजय राणे, संयुक्त कार्यवाह जतिन टाकळे, खजिनदार प्रफुल पाटील, रमेश नाटेकर, निलेश सावंत आदी मान्यवरांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले.