मुंबई : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित आंतर शालेय खोखो स्पर्धेत मुलांमध्ये मॉर्डन इंग्लिश स्कूल व नंदादीप हायस्कूल-गोरेगाव तर मुलींमध्ये न्यू इंग्लिश स्कूल व पीपल्स एज्युकेशन सोसायटी संघांनी अंतिम फेरीत प्रवेश केला. अलाहिदा डावापर्यंत रंगलेल्या मुलांच्या उपांत्य सामन्यात मॉर्डन इंग्लिश स्कूलने सिध्दार्थ नगर न्यू स्कूलचा ७-६ असा चुरशीचा पराभव केला. मॉर्डन स्कूलच्या विघ्नेश कोरे (४:२० मि., नाबाद ५:०० मि., २:३० मि.) तर पराभूत संघाच्या सचिन सहानी (नाबाद ८:१० मि., ४:१० मि. व २ गडी) यांच्या संरक्षणामधील हुलकावणीसह दमदार खेळाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली.
अमर हिंद क्रीडांगणामधील दुसऱ्या सामन्यात नंदादीप हायस्कूलने अंतिम फेरीत सहज धडक देतांना न्यू इंग्लिश स्कूलचा एका डावासह १४-८ असा मोठा पराभव केला. नंदादीप हायस्कूलच्या विजयात प्रणीत सोगम (३:१० मि., १:४० मि. व २ गडी), चिन्मय पाटील (२:३० मि. व ४ गडी), पृषण जाधव (२:५० मि., ३ गडी) यांचा अप्रतिम खेळ निर्णायक ठरला. पराभूत संघातर्फे समर्थ सावंतने (२ मि. व ४ गडी) अष्टपैलू खेळ केला. मुलींच्या पहिल्या उपांत्य सामन्यात साक्षी पारसेकर (७:१० मि. व ३ गडी), धानी रोलेकर (४:२० मि. व ३ गडी) व वैष्णवी जाधव (नाबाद ३:५० मि., नाबाद १:५० मि.) यांच्या आक्रमक खेळामुळे न्यू इंग्लिश स्कूलने समता विद्यामंदिरवर एका डावासह ८-३ असा धडाकेबाज विजय मिळविला. अलाहिदा डावापर्यंत रंगलेल्या मुलींच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात पीपल्स एज्युकेशन सोसायटीने मॉर्डन इंग्लिश स्कूलला ९-५ असे चकविताना दर्शिता शर्मा (५:३० मि., ३ मि., नाबाद ३:५० मि.) व इशिका सिंग (१:५० मि. व ७ गडी) चमकल्या. मॉर्डन इंग्लिश स्कूलच्या सृष्टी पाष्टेने (नाबाद ३:३०मि., नाबाद ४ मि., ३:३० मि. व १ गडी) छान खेळ केला.