(संग्रहित छायाचित्र)
महागाईविरोधात सभागृहात फलक घेऊन निदर्शने केल्याबद्दल काँग्रेसच्या चार खासदारांना लोकसभेतून संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आलं आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी यापूर्वी आंदोलन न करण्याचा करण्याचा इशारा दिला होता. आंदोलन करायचं असेल तर त्यांनी सभागृहाच्या बाहेर आंदोलन करावं, असंही ते म्हणाले होते.
पण काँग्रेसच्या खासदारांनी महागाईविरोधातील आपलं आंदोलन सुरूच ठेवलं. त्यामुळे काँग्रेसच्या ४ खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. परिणामी त्यांना आता संपूर्ण अधिवेशनासाठी मुकावं लागणार आहे. मणिकम टागोर, जोथिमणी, रम्या हरिदास आणि टीएन प्रतापन असं निलंबित करण्यात आलेल्या काँग्रेस खासदारांची नावं आहेत. निलंबनाची कारवाई केल्यानंतर चारही खासदारांनी संसद भवनासमोरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ जाऊन जोरदार घोषणाबाजी केली आहे.
दुपारी ३ नंतर महागाईबाबत चर्चेसाठी तयार आहोत, परंतु सभागृहात फलक घेऊन केलेलं आंदोलन सहन करणार नाही. तुम्हाला जर फलक दाखवून आंदोलन करायचं असेल तर ते सभागृहाबाहेर करा. मी चर्चेसाठी तयार आहे, माझ्या दयाळूपणाला कमकुवतपणा समजू नका, असा इशारा लोकसभा अध्यक्षांनी दिला. त्यानंतर त्यांनी उद्यापर्यंत कामकाज तहकूब केलं.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहात यावं आणि महागाई व खाद्यपदार्थांवर अलीकडेच वाढवलेल्या जीएसटीबाबत आपलं मत व्यक्त करावं” अशी मागणी आंदोलनकर्त्या काँग्रेस खासदारांनी केली आहे. तसेच १८ जुलै रोजी पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून महागाईबाबत चर्चा करावी, अशी मागणीही विरोधी पक्षाकडून करण्यात येत आहे.