सांगली : इस्लामपूरमधील शिवसेना नगरसेविका प्रतिभा शिंदे यांच्या पतीला आज सकाळी सात ते आठ जणांच्या टोळक्याने जबर मारहाण (Beating) केल्याची घटना सांगलीत घडली आहे. शिवकुमार शिंदे असे मारहाण झालेल्या नगरसेविकेच्या पतीचे नाव आहे. शिंदे गटात सामील होण्यासाठी ही मारहाण झाल्याचा आरोप प्रतिभा शिंदे आणि त्यांचे पती शिवकुमार शिंदे यांनी केला आहे. मात्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मारहाण झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या मारहाणीत शिवकुमार शिंदे जखमी झाले असून त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. जखमी शिंदे यांना मिरज रोडवरील भारती हॉस्पिटल येथे ICU मध्ये उपचारासाठी दाखल केले आहे.
एकनाथ शिंदे गटातील सांगलीचे शिवसेना जिल्हा प्रमुख आनंद पवार यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप जखमी शिंदेंनी केला आहे. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आनंद पवार हे शिंदे गटात या अशा धमक्या देत असल्याने आम्ही शिवसेनेच्या पदाचा राजीनामा पाठवला होता. तरी आज सकाळी दूध आणण्यासाठी गेले असता टोळक्याकडून अचानक मारहाण झाल्याची माहिती शिवकुमार शिंदे यांनी दिली. तर पोलिसांनी शिंदे गटातील सहा ते सात जणांवर 307 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पोलिसांनी शिंदे पती-पत्नीचा आरोप फेटाळला असून, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मारहाण झाल्याचे पोलिसांनी सांगितले.