मुंबई : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित आंतर शालेय खोखो स्पर्धेत साने गुरुजी विद्यालय, मॉर्डन इंग्लिश स्कूल, सोशल सर्व्हिस लीग स्कूल, संत काकय्या मार्ग मनपा शाळा, सिध्दार्थ नगर न्यू स्कूल आदी शाळांनी सलामीचे सामने जिंकले. साहिल पवार (३.२० मि., १.२०मि. व ५ बळी) व पार्थ शिंगटे (१.५० मि., ३.४०मि. व ३ बळी) यांच्या अष्टपैलू खेळामुळे साने गुरुजी विद्यालयाने श्री गौरी दत्त शाळेचा एका डावासह ९ गुणांनी विजय मिळवून दुसरी फेरी गाठली. स्पर्धेचे उद्घाटन राष्ट्रीय खोखोपटू प्रसाद राडीये, कार्याध्यक्ष दत्ता सावंत, विश्वस्त अरुण देशपांडे, संयुक्त कार्यवाह जतीन टाकळे, दीपक साडविलकर, रमेश नाटेकर, निलेश सावंत आदी मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.
दादर-पश्चिम येथील अमर हिंद मंडळाच्या क्रीडांगणात मॉर्डन इंग्लिश स्कूलने श्री गणेश इंग्रजी शाळेचा ६-४ असा चुरशीचा पराभव करताना विघ्नेश कोरेने अप्रतिम हुलकावणीसह ५ मिनिटे पळतीचा खेळ केला. विघ्नेशला सरस करंगुटकर (२ मि. व २ बळी) व यशराज पाटील ( २ बळी) यांनी उत्तम साथ दिली. पराभूत संघाचा कौशल पाटील (२.२० मि. व १ बळी) चमकला. प्रतिक सापते (३ बळी) व अथर्व अनुभवने (२ बळी) यांच्या आक्रमक खेळामुळे सोशल सर्व्हिस लीग स्कूलने समता विद्यामंदीरवर ४ मिनिटे राखून ९-८ असा विजय मिळविला. समता विद्यामंदिरच्या सुशेन साईलने (१.४० मि. व २ बळी) पराभव टाळण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. संत काकय्या मार्ग मनपा शाळेने श्री गणेश माध्यमिक शाळेविरुध्द २.३० मिनिटे राखून १४-१२ असा तर सिध्दार्थ नगर न्यू स्कूलने पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्कूलविरुद्ध १७-१ असा विजय मिळवून पहिली फेरी जिंकली.