मुंबई : माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आनंदराव अडसूळ यांच्या अध्यक्षतेखाली सहकारी बँकेतील कर्मचाऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या एकमेव मान्यता प्राप्त को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन, मुंबई तर्फे ६३ व्या वर्धापन दिनानिमित्त आंतर को-ऑपरेटिव्ह बँक कॅरम व बुध्दिबळ स्पर्धा १४ व १५ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे. दोन्ही स्पर्धांचे आयोजन भवानी शंकर रोड, दादर-पश्चिम येथील युनियनच्या कार्यालय परिसरात होणार असून प्रतिष्ठेच्या कॅरम स्पर्धेत मुंबई शहर, उपनगर व ठाणे जिल्ह्यातील सहकारी बँकेमधील एकूण २५० खेळाडूंनी भाग नोंदविला आहे.
एकेरी कॅरम स्पर्धेत पुरुषांमध्ये अपना सहकारी बँकेचा मंदार भरताव प्रथम मानांकित व कोकण मर्कंटाईल को-ऑप. बँकेचा वासिम खान द्वितीय मानांकित तर महिलांमध्ये म्युनिसिपल को-ऑप. बँकेची संध्या बापेरकर प्रथम व म्युनिसिपल को-ऑप. बँकेची उषा कांबळे द्वितीय मानांकित आहे. अखिल भारतीय कॅरम फेडरेशनच्या प्रचलित नियमावलीनुसार प्रिसाईस कॅरम बोर्डवर होणारी स्पर्धा पुरुष एकेरी व दुहेरी, महिला एकेरी व दुहेरी अशा एकूण चार गटात आंतरराष्ट्रीय कॅरम पंच परविंदर सिंग यांच्या तर बुध्दिबळ स्पर्धा एकाच मिश्र गटात आर्बीटर पुरुषोत्तम भिलारे यांच्या नियंत्रणाखाली होईल. विजेत्या-उपविजेत्यांना रोख पुरस्कारासह आकर्षक चषक दिले जाणार आहेत. स्पर्धेचे उदघाटन को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ, जनकल्याण सहकारी बँकेचे संचालक चंद्रशेखर वझे, विश्वविजेता कॅरमपटू प्रशांत मोरे आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत १४ जानेवारीला सकाळी ११ वा. होणार आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी युनियनचे कार्याध्यक्ष सुनील साळवी, सरचिटणीस नरेंद्र सावंत, खजिनदार प्रमोद पार्टे, सहखजिनदार जनार्दन मोरे, प्रवीण शिंदे, भार्गव धारगळकर, हाशम धामसकरसह इतर पदाधिकारी कार्यरत आहेत.
******************************
..