मुंबई : 37 व्या डिपार्टमेंट ऑफ अॅटोमिक एनर्जी-डीएई क्रीडा व कला महोत्सव अंतर्गत एलोरा ग्रुप निवड चाचणी बुध्दिबळ स्पर्धेत अपराजित गोपाळ सुर्वेने सर्वाधिक ४.५ गुण नोंदवीत विजेतेपद पटकाविले. पहिल्या पटावरील निर्णायक स्विस लीग सामन्यात गोपाळ सुर्वेने प्रथम मानांकित दीपक वाईकरला हरविणाऱ्या रक्तिम दास विरुध्द सावध खेळ करीत २८ व्या चालीला बरोबरी साधली आणि प्रथम स्थानाला गवसणी घातली. अॅटोमिक एनर्जी रिक्रिएशन क्लबतर्फे आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी सहकार्याने झालेल्या स्पर्धेमधील विजेत्या-उपविजेत्यांना शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण व अॅटोमिक एनर्जी रिक्रिएशन क्लबचे सेक्रेटरी संजय सकपाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत गौरविण्यात आले.
दुसऱ्या पटावर द्वितीय मानांकित बाबाहिरू पंधरेने अप्रतिम चाली रचत ४५ व्या चालीला तृतीय मानांकित धर्मवीर सिंगला शह दिला आणि उत्तम सरासरीच्या बळावर ४ गुणांसह द्वितीय स्थानावर झेप घेतली. तिसऱ्या पटावर मयूरकुमार भानुशाली विरुध्द रोनक गुप्ता लढतीमधील सिसिलियन डावात ५६ व्या चालीला दोघांनीही बरोबरी मान्य केली. चौथ्या पटावर अनिलकुमार नाईकने (४ गुण) ३४ व्या चालीला हेमंत गुप्ता विरुध्द सामना जिंकून तृतीय स्थान गाठले. रक्तिम दासने (४ गुण) चौथा, रोनक गुप्ताने (३.५ गुण) पाचवा, मयुरकुमार भानुशालीने (३.५ गुण) सहावा, दीपक वाईकरने (३.५ गुण) सातवा तर अमित प्रभालेने (३.५ गुण) आठवा क्रमांक मिळविला. पहिले सहा क्रमांक विजेते २० फेब्रुवारीला होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील अंतर्गत बुध्दिबळ स्पर्धेमध्ये डीएई-एलोरा ग्रुपचे प्रतिनिधित्व करणार आहेत.