मुंबई : .. समाज माध्यमांचा विवेकी पद्धतीने वापर करण्यासाठी लोकांना माध्यम साक्षर करणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन पुणे आकाशवाणी केंद्राचे माजी सहसंचालक नितीन केळकर यांनी केले. मुंबई विद्यापीठाच्या गरवारे व्यवसाय शिक्षण आणि विकास संस्थेच्या प्रांगणात रविवार दिनांक आठ जानेवारी रोजी मराठी पत्रकारिता वर्गाच्या वतीने सहा जानेवारी रोजी झालेल्या पत्रकार दिनाचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या व्याख्यानाच्या निमित्ताने ते बोलत होते. प्रसार माध्यमांतील नव्या बदलांचा वेध घेण्यासाठी ‘डिजिटल दशकातील प्रसार माध्यमांची भूमिका आणि वाढती जबाबदारी’ या विषयावर हे व्याख्यान आयोजित करण्यात आले. गरवारे संस्थेचे संचालक डॉ. केयूर कुमार नायक यांच्या अध्यक्षतेखाली हा उपक्रम साजरा करण्यात आला.वर्गाच्या समन्वयक आणि आकाशवाणीच्या वृत्त निवेदक नम्रता कडू यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे स्मरण करून १९० वर्षांपूर्वीची पत्रकारिता ते आजची पत्रकारिता यांचा आढावा या निमित्ताने घेण्यात आला.
सध्या प्रसारमाध्यमांमध्ये तंत्राला अधिक महत्त्व आले आहे आणि तंत्रज्ञानाच्या हव्यासापोटी काम करण्याचा मंत्र मात्र हरवत चाललेला आहे. तंत्राचा अतिरेक झाल्यामुळे उत्तम मजकूर देण्यायोग्य व्यासंगी माणसे मागे पडत चालली आहेत. पारंपरिक माध्यमांनी त्यांच्या डिजिटल आवृत्तींकडे अधिक गांभीर्याने बघणे खूपच आवश्यक आहे .भविष्यात डिजिटल आवृत्ती ही मुख्य उत्पादन,तर पारंपरिक मुद्रित माध्यमे ही पूरक उत्पादन असणार आहेत. पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांनी प्रसारमाध्यमांमध्ये काम करताना त्यांची असणारी बांधिलकी वृत्तसंस्थेशी आणि जबाबदारी ही जनतेप्रती असते आणि या दोन्हीचा योग्य समन्वय साधला तरच उत्तम पत्रकारिता करता येते. कोणतेही स्वातंत्र्य हे काही निर्बंधांशिवाय मिळत नाही,हे सतत ध्यानात ठेवले पाहिजे असा संदेश नीतीन केळकर यांनी दिला.
या व्याख्यानाच्या निमित्ताने महाराष्ट्र टाइम्स चे वरिष्ठ उपसंपादक वैभव वझे ॲड फॅक्टर्स कंपनीचे जनसंपर्क अधिकारी शैलेश कसबे, नवी मुंबई साहित्य परिषदेचे कार्यवाह मोहन ढवळीकर आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांनीही विद्यार्थ्यांना या विषयाच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले. या व्याख्यानासाठी वर्गाचे आजी आणि माजी विद्यार्थी उपस्थित होते.या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या अनेक शंकांचे निरसन करताना,पत्रकारितेच्या भविष्यकालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी त्यांनी कोणती कौशल्ये आत्मसात केली पाहिजेत याबाबतही नीतीन केळकर यांनी मार्गदर्शन केले. ..