क्रीडा प्रतिनिधी
मुंबई : गरवारे क्लब हाऊसतर्फे शनिवार, दिनांक ७ जानेवारी २०२३ रोजी पहिली गरवारे क्लब हाऊस (जीसीएच) शरद पवार अखिल भारतीय फिडे रॅपिड रेटिंग खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन वानखेडे स्टेडियम येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेत भारताची सर्वात युवा महिला ग्रँडमास्टर (डब्ल्यूजीएम) सौम्या स्वामीनाथन सहभागी होणार आहे. याशिवाय दोन आंतरराष्ट्रीय मास्टर, तीन महिला मास्टर आणि अनेक कँडिडेट मास्टर बुद्धिबळपटूंनी आपला सहभाग निश्चित केला आहे.
शरद पवार अखिल भारतीय फिडे रॅपिड रेटिंग खुल्या बुद्धिबळ स्पर्धेसाठी गरवारे क्लब हाऊसकडे महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशभरातून चारशेहून अधिक प्रवेशिका दाखल झाल्या आहेत. यापैकी ७० टक्के मुलांचा समावेश आहे. मुंबईच्या बुद्धिबळ इतिहासात सर्वाधिक बुद्धिबळपटूंचा सहभाग असलेली ही महाबुद्धिबळ स्पर्धा असणार आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेतील विजेत्याला शरद पवार चषक आणि दोन लाख रुपयांचे बक्षीस देऊन गौरवण्यात येईल. याचप्रमाणे अन्य ४५ विजेत्यांनाही सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती गरवारे क्लब हाऊसचे संचालक आणि बुद्धिबळ समितीचे अध्यक्ष मोहित चतुर्वेदी यांनी दिली.
“आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ क्षेत्रातील गुणवत्ता जोपासण्याची ही संधी आमच्या गरवारे क्लब हाऊसला शरद पवार अखिल भारतीय फिडे रॅपिड रेटिंग खुल्या बुद्धिबळ स्पर्धेच्या निमित्ताने मिळत आहे. याचा आम्हाला अभिमान वाटतो. स्पर्धेत मोठ्या संख्येने बुद्धिबळपटूंनी भाग घेतला असला तरी मुंबई शहर जिल्हा बुद्धिबळ संघटना, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना आणि गरवारे क्लबची कार्यकारिणी समिती हे यशस्वीपेणे पेलते आहे,” असे गरवारे क्लब हाऊसचे उपाध्यक्ष राज पुरोहित यांनी सांगितले.
पवार यांच्या हस्ते उद्घाटन; चौहान, ठिपसे, कुंटे यांची उपस्थिती
या अखिल भारतीय बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन गरवारे क्लब हाऊसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते सकाळी ९ वाजता होणार आहे. या उद्घाटन कार्यक्रमाला फिडे वल्र्ड एडव्हायजरी कौन्सिलचे (फिडे जागतिक सल्लागार परिषद) कार्याध्यक्ष आणि अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाचे माजी सचिव भरत सिंग चौहान यांच्यासह महा बुद्धिबळ असोसिएशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे आणि ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे हे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहेत.