पुणे : : भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी२० मालिकेतील अंतिम सामना शनिवारी, ७ जानेवारी रोजी राजकोटमध्ये खेळवला गेला. भारताने श्रीलंकेला धूळ चारत तब्बल ९१ धावांनी दणदणीत विजय मिळवला. राजकोट येथील सामन्यात भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव याने पुन्हा एकदा वादळी खेळी केली. त्याने यादरम्यान शतक झळकावत खास विक्रम आपल्या नावावर नोंदवला. त्याने युवराज सिंग आणि विराट कोहली यांच्यापेक्षा जास्त वेळा अशी कामगिरी करण्याचा मान मिळवला आहे. त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. तर अक्षर पटेलला मालिकावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
पहिल्या टी२० मध्ये टीम इंडियाने २ धावांनी विजय मिळवत १-० अशी आघाडी घेतली होती, तर पुण्यातील दुसऱ्या सामन्यात पाहुण्या संघाने पुनरागमन करत १६ धावांनी विजय मिळवून मालिकेत बरोबरी साधली होती. आता निर्णायक सामन्यात टीम इंडियाने शानदार कामगिरी करत नवीन वर्षातील पहिला मालिका विजय नोंदवला. टीम इंडियाने हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली सलग तिसरी मालिका जिंकली. त्याचबरोबर श्रीलंकेने सामना जिंकण्यासाठी खूप प्रयत्न केले मात्र ते अपयशी ठरले.
२२८ धावांचा डोंगर पार करताना श्रीलंकेची सुरुवात चांगली झाली होती. सलामीवीर मेंडीस आणि निसंका यांच्यात ४४ धावांची भागीदारी झाली. मात्र दोघे अनुक्रमे २३ आणि १५ धावा करून बाद झाले. या दोंघाच्या बाद होण्यानंतर श्रीलंकेच्या डावाला गळतीच लागली. अविष्का फर्नांडो १ धाव काढून बाद झाला. धनंजय डिसिल्वाने २२, चरिथ असालांकाने १९, दसुन शनाकाने २३ धावा करत संघर्ष करण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांचे प्रयत्न अपुरे ठरले. हसरंगा ९ धावांवर , करूणरत्ने शून्यावर, महेश तीक्षणा २ धावांवर तर मदुशंकाने १ धाव काढून बाद झाला. भारताकडून अर्शदीप सिंग ने सर्वाधिक ३ गडी बाद केले. तर हार्दिक, उमरान आणि चहल ने प्रत्येकी २ गडी बाद करत विजयात आपले योगदान दिले. अक्षर पटेलला देखील एक गडी बाद करण्यात यश मिळाले.
सामन्यात नाणेफेक जिंकताच हार्दिकने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाने गेल्या सामन्यात पराभव स्वीकारल्यानंतर संघात एकही बदल केला नाही. पण श्रीलंकेने मात्र फलंदाजीत एक बदल केला. इशान किशन पहिल्याच षटकात बाद झाला. पण त्यानंतर राहुल त्रिपाठीने मात्र हार्दिकचा निर्णय योग्य ठरवला. नवख्या राहुल त्रिपाठीने १६ चेंडूत तुफानी ३५ धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादवने दमदार खेळीला सुरूवात केली. शुबमन गिलच्या साथीने त्याने अर्धशतकी भागीदारी केली. त्यानंतरही तो फटकेबाजी करतच राहिला. शुबमन गिल अर्धशतकाच्या जवळ पोहोचला पण त्याला ४४ धावांवर हसरंगाने माघारी धाडले.
श्रीलंकेच्या गोलंदाजांनी चाहत्यांना नाराज केले. मदुशंका आणि करूणरत्ने दोघांनी चार षटकाच ५० पेक्षा जास्त धावा दिल्या तर तीक्षणानेदेखील ४८ धावा खर्च केल्या. त्यानंतर कर्णधार हार्दिक पांड्या मोठा फटका मारताना ४ धावांवर बाद झाला. पाठोपाठ दिपक हु़ड्डादेखील ४ धावांवरच बाद झाला. हे दोघेही स्वस्तात बाद झाले पण सूर्यकुमारने मात्र फटकेबाजी बंद केली नाही. त्याने वाऱ्याच्या वेगाने बॅट फिरवत आपले तिसरे आणि भारतीय फलंदाजाकडून यंदाच्या वर्षातील पहिले टी२० शतक ठोकले. त्याने अवघ्या ४५ चेंडूत १०० धावा केल्या. अक्षर पटेलनेही चांगली फटकेबाजी केली. त्याने ९ चेंडूत ४ चौकारांसह नाबाद २१ धावा कुटल्या. त्यानंतर सूर्यकुमार यादवने नाबाद ११२ धावा करत संघाला २२८ धावांची मजल मारून दिली. सूर्याने ७ चौकार आणि ९ षटकार खेचले.