मुंबई – यंदा दोन वर्षानंतर ‘माणदेशी महोत्सव’ पुन्हा मुंबईमध्ये परतला आहे. दोन वर्षांच्या कालावधीनंतर बहुप्रतिक्षित असा हा पाचवा माणदेशी महोत्सव यंदा ५ जानेवारी ते ८ जानेवारी २०२३ दरम्यान प्रभादेवी येथील रविंद्र नाट्यमंदिराच्या प्रांगणात भरणार आहे. ५ जानेवारी सकाळी प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक आशुतोष गोवारीकर आणि अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या हस्ते उदघाटन झाले. यावेळी माणदेशी फाउंडेशनच्या अध्यक्षा चेतना सिन्हा, व्यवस्थापकीय विश्वस्त रेखा कुलकर्णी उपस्थित होत्या. सायंकाळी मंगळागौर कार्यक्रमास माजी शिक्षणमंत्री आशीष शेलार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
माणदेशी सारख्या दुष्काळी भागातील या भगिनी व्यवसाय करतात आणि त्याचं मुंबई मध्ये प्रदर्शन भरवतात ही फार प्रेरणादायी गोष्ट आहे. चेतना सिन्हा यांनी लावलेल्या रोपाचे वटवृक्षात रुपांतर झाले आहे. माणदेशी महोत्सव ग्रामीण महिलांच्या कष्टांची ओळख बनलेला आहे, अशा शब्दांत सिनेदिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी महोत्सवाचे कौतुक केले.
संकटावर मात करून महिला शक्ती काय करु शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे माणदेशी महोत्सव आहे. या सगळ्या जणींचा संघर्ष शब्दांपलिकडचा आहे. या संघर्षाला सलाम करण्यासाठी प्रत्येकाने महोत्सवाला भेट दिली पाहिजे, असे मनोगत अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
माणदेशी महोत्सव म्हणजे निव्वळ माणदेशी भगिनींचा महोत्सव राहिलेला नसून तो महाराष्ट्रातील संघर्ष करणाऱ्या प्रत्येक महिलांचा आहे. हा महोत्सव देशांतील प्रत्येक शहरांमध्ये भरवला जावा जेणेकरुन आपल्या महाराष्ट्राची अस्सल ग्रामीण संस्कृती देशभर पोहोचेल. चेतना सिन्हांचे हे कार्य तळागाळात पोहोचणे आवश्यक आहे, असे माजी शिक्षणमंत्री आशीष शेलार यांनी म्हटले.
माणदेशी महोत्सवास मुंबईकरांनी भेट देऊन आपल्या या माणदेशी भगिनींना प्रोत्साहित करावे, असे आवाहन माणदेशी फाऊंडेशनच्या अध्यक्षा चेतना सिन्हा यांनी केले आहे.
यंदाच्या महोत्सवात प्रसिद्ध भारुडकार चंदाताई तिवाडी आपली कला सादर करणार आहेत. माणदेशी चॅम्पीयन महिला कुस्ती त्याचबरोबर माणदेशी लोकनृत्याचा प्रकार असलेले ‘गझी नृत्य’ पाहण्यास देखील मिळणार आहे. त्याचप्रमाणे १० लाख महिलांचा परिवार असलेल्या माणदेशातील काही शेतकरी, उद्योजिका आणि ऍथलिट्स भगिनी आपल्या संघर्षगाथा माणदेशीच्या व्यासपीठावरुन उलगडणार आहेत.
यासोबत या महोत्सवात आपण स्वतःहा कुभांरकाम करण्याचा आनंद घेऊ शकता, स्वत: उभं राहून लाटणं तयार करुन घ्या, लाखेच्या बांगड्या बनवून घ्या, टोपली किंवा झाडू वळवून घ्या, ही सारी काही गावातली संस्कृती येथे अनुभवता येणार आहे. जर तुम्ही खवय्ये असाल तर साताऱ्याचा खर्डा, शेंगदाण्याच्या चटणीसह वेगवेगळ्या चटण्या, लोणची, ज्वारीची भाकरी, कुरड्या, मासवड्या, साताऱ्याचे जगप्रसिद्ध कंदी पेढे तुमच्या प्रतिक्षेत आहेत त्याच बरोबर साताऱ्याची प्रसिद्ध जेन घोंगडी विसरुन चालणार नाही, या महोत्सवात तुम्ही ही खरेदी करु शकता.
तेव्हा माणदेशी महोत्सवाला भेट द्या. तुमच्या भेटीसाठी माणदेशी भगिनी व शेतकरी उत्सुक आहेत. ५, ६, ७, ८ जानेवारी दरम्यान सकाळी १०.३० ते रात्री ८.३० या वेळेत कधीही भेट देता येणार आहे. हा महोत्सव सर्वासाठी मोफत आहे.
—
”माणदेशी महोत्सव” २०२३
ग्रामीण उद्योजक स्त्रियांचा महोत्सव
चार दिवसाच्या कार्यक्रमाची रूपरेषा –
• शुक्रवार, ६ जानेवारी – दुसरा दिवस – प्रसिद्ध भारुडकार चंदाताई तिवाडी
यांचे भारुडाचे सादरीकरण – सायंकाळी ६.०० वाजता.
• शनिवार, ७ जानेवारी – तिसरा दिवस – महिला कुस्ती स्पर्धा, सायंकाळी ६.०० वाजता.
• रविवार, ८ जानेवारी – चौथा दिवस – माणदेशातील काही शेतकरी, उद्योजिका आणि ऍथलिट्स भगिनींची संघर्षगाथा सादरीकरण, सायंकाळी ६.००वाजता.
रात्री ९.३० वाजता माणदेशी महोत्सवाची सांगता.