भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे राष्ट्राला उद्देशून निरोपाचे भाषण
प्रिय देशबांधवांनो,
नमस्कार!
1. आजपासून पाच वर्षांपूर्वी, आपण सर्वांनी माझ्यावर विश्वास दर्शवला होता आणि आपल्या सर्व निर्वाचित लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून माझी भारताच्या राष्ट्रपतीपदी निवड केली होती. आज माझा कार्यकाळ पूर्ण होत आहे. याप्रसंगी आपल्याला काही गोष्टी सांगण्याची माझी इच्छा आहे.
2. सर्वात आधी, मी आपल्या सर्व देशवासियांच्या प्रती आणि लोकप्रतिनिधींच्या प्रती मन:पूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो. संपूर्ण देशभरात मी केलेल्या प्रवासादरम्यान, नागरिकांशी साधलेल्या संवाद आणि संपर्कादरम्यान, मला सातत्याने प्रेरणा मिळत राहिली. लहान-लहान गावात राहणारे आपले शेतकरी आणि कामगार बंधू-भगिनी, नव्या पिढीचे आयुष्य घडवणारे आपले शिक्षक, आपला वारसा अधिक समृद्ध करणारे आपले कलाकार, आपल्या देशातील विविध विचारांचे, पैलूंचे अध्ययन करणारे विद्वान, देशाला अधिकाधिक समृद्ध करणारे उद्योजक, देशबांधवांची सेवा करणारे डॉक्टर्स आणि परिचारिका, राष्ट्र-उभारणीच्या कार्यात गुंतलेले वैज्ञानिक आणि अभियंते, देशाच्या न्यायव्यवस्थेत आपले योगदान देणारे न्यायाधीश आणि अधिवक्ते, प्रशासन सुव्यवस्थितपणे चालवणारे सनदी अधिकारी-कर्मचारी, प्रत्येक वर्गाला विकासाच्या प्रवाहाशी जोडण्यासाठी कार्यरत असलेले आपले सामाजिक कार्यकर्ते, भारतीय समाजात आध्यात्मिक प्रवाह कायम ठेवणारे सर्व धर्म-पंथातले आचार्य आणि गुरुजन, आपण सर्वांनीच, मला माझ्या कर्तव्यपूर्तीसाठी खूप सहकार्य केले आहे. थोडक्यात सांगायचे तर, समाजाच्या सर्व वर्गांकडून मला संपूर्ण सहकार्य, पाठिंबा आणि आशीर्वाद मिळालेत.
3. माझ्या मन-बुद्धीत ते विशेष क्षण कायम कोरलेले राहणार आहेत, जेव्हा माझी भेट आपल्या सैन्यदलातील जवानांशी, निमलष्करी दलांशी, तसेच पोलिसांच्या शूर जवानांशी होत असे. त्या सर्वांमध्ये देशप्रेमाची अद्भुत भावना बघायला मिळते. माझ्या परदेश दौऱ्यादरम्यान, जेव्हा कधी अनिवासी भारतीयांशी माझी भेट झाली, त्या प्रत्येक वेळी मला आपल्या मातृभूमीच्या प्रती त्यांचे अथांग प्रेम आणि आपलेपणाची जाणीव झाली. देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कार समारंभाच्या दरम्यान, मला अनेक असामान्य प्रतिभांना भेटण्याची संधी मिळाली. हे सगळे मान्यवर, आपली संपूर्ण चिकाटी, अतूट समर्पण आणि दृढनिष्ठेने, एका उत्तम भारताची निर्मिती करण्यात सक्रिय आहेत.
4. त्याचप्रमाणे, अनेक देशबांधवांना भेटल्यानंतर माझा हा विश्वास अधिक दृढ झाला, की आपले निष्ठावान नागरिकच खरे तर राष्ट्रनिर्माते असतात आणि ते सगळेच, भारताला एक उत्तम देश बनवण्यासाठी कार्यरत आहेत. अशा सर्व निष्ठावान देशबांधवांच्या हातात, आपल्या या महान देशाचे भविष्य सुरक्षित आहे.
प्रिय देशबांधवांनो,
5. माझ्या या अनुभवांतून पुढे जात असतांना, मला कायम माझे बालपण देखील आठवत असे. आणि हे ही जाणवत असे, की कशाप्रकारे महत्वाच्या ऐतिहासिक घटना, आपल्या वैयक्तिक आयुष्याला देखील प्रभावित करतात.
6. जेव्हा माझ्या छोट्याशा गावात एक सर्वसामान्य बालकाच्या नजरेतून मी आयुष्य समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो, तेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळून काही वर्षेच झाली होती. देशाच्या पुनर्बांधणीसाठी लोकांमध्ये एक वेगळाच उत्साह दिसत असे; त्यांच्या डोळ्यांत नवी स्वप्ने होती. माझ्या मन-बुद्धीच्या पटलावरही एक अस्पष्ट असा विचार साकार होत होता, की एकदिवस कधीतरी मी माझ्या देशाच्या उभारणीत योगदान देऊ शकेन. छोट्याशा कच्च्या घरात राहणाऱ्या एका कुटुंबातल्या माझ्यासारख्या सर्वसामान्य मुलाला आपल्या प्रजासत्ताक देशाच्या सर्वोच्च संवैधानिक पदाविषयी काही माहिती असणे देखील कल्पनेच्या पलीकडचे होते. मात्र, ही भारताच्या लोकशाहीची ताकद आहे, ज्यात प्रत्येक नागरिकासाठी असे मार्ग खुले आहेत, ज्यांच्यावरुन चालत तो देशाचे प्राक्तन अधिक उज्ज्वल करण्याच्या कार्यात आपली महत्वाची भूमिका पार पाडू शकतो. कानपूर देहात जिल्हयातील परौख गावातल्या अगदी अतिसामान्य घरात जन्मलेला आणि मोठा झालेला तो रामनाथ कोविन्द आज आपल्या सर्व देशबांधवांना संबोधित करतो आहे, यासाठी, मी आपल्या देशाच्या चैतन्यमय लोकशाही व्यवस्थेच्या शक्तीला शतश: वंदन करतो.
7. आता मी आपल्या गावाचा उल्लेख केलाच आहे, तर मला इथे आणखी एका गोष्टीचा उल्लेख करायला आवडेल, की माझ्या राष्ट्रपतीपदाच्या कार्यकाळाच्या दरम्यान, माझ्या मूळ गावाचा दौरा करणे आणि कानपूरच्या माझ्या शाळेतील वयोवृद्ध शिक्षकांच्या पायांना वंदन करुन त्यांचे आशीर्वाद घेणे, हे क्षण, कायम माझ्या आयुष्यातील सर्वात संस्मरणीय क्षणांपैकी काही क्षण असतील. याच वर्षी पंतप्रधान देखील माझ्या मूळगावी, परौंख इथे आले आणि त्यांनी माझ्या गावाच्या भूमीचा सन्मान वाढवला. आपल्या मूळांना घट्ट धरून राहणे, हे भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. मी युवा पिढीलाही असे आवाहन करेन, की आपले गाव किंवा शहर अथवा आपल्या शाळा आणि शिक्षकांशी जोडले राहण्याची ही परंपरा त्यांनीही पुढे न्यावी.
प्रिय देशबांधवांनो,
8. सध्या सगळे देशबांधव “स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहेत. पुढच्या महिन्यात आपण सगळे भारताचा 75 वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहोत. त्यावेळी आपण 25 वर्षांच्या त्या ‘अमृतकाळात’ प्रवेश करु, जो स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षांत, अर्थात 2047 साली पूर्ण होणार आहे. हे विशेष ऐतिहासिक वर्ष आमच्या गणराज्याच्या प्रगतीपथावरील मैलाचा दगड ठरणारे आहे. आपल्या लोकशाहीची ही विकास यात्रा, देशाच्या सुवर्णमयी शक्यतांना, प्रत्यक्ष मूर्तरूप देत, जागतिक समुदायासमोर एक ‘श्रेष्ठ भारत’ सादर करण्याची यात्रा आहे.
9. आधुनिक काळात, आपल्या देशाच्या या गौरवास्पद यात्रेचा प्रारंभ ब्रिटिश अधिपत्याच्या काळात, देशप्रेमाची भावना जागृत होत, स्वातंत्र्यलढ्यापासून झाला. एकोणिसाव्या शतकात संपूर्ण देशभरात पारतंत्र्याविरुद्ध अनेक बंड झाले. देशबांधवांमध्ये एका नव्या आशेची ज्योत प्रज्वलित करणाऱ्या अशा सगळ्या बहुतांश लढवय्या नेत्यांची नावे काळाच्या ओघात हरवून गेली होती. मात्र त्यांच्या शौर्यगाथांचे आता आदराने स्मरण केले जात आहे. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी आणि विसाव्या शतकाच्या प्रारंभीच्या काळात, देशात नव्या लोकचेतनांचा संचार होत होता आणि स्वातंत्र्यलढ्याचे अनेक प्रवाह वाहू लागले होते.
10. 1915 साली जेव्हा गांधीजी मायदेशी परत आले, त्यावेळी देशात राष्ट्रीयत्वाची भावना अधिक प्रखर होत होती. अनेक महान लोकनायकांच्या ह्या उज्ज्वल आकाशगंगेसारखा जो प्रकाश आपल्या देशात विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या दशकात पसरू लागला होता, ती जगाच्या इतिहासातला एक अद्भुत घटना होती. जिथे, एकीकडे आधुनिक जगातील ‘ऋषीतुल्य’ व्यक्तिमत्व असलेले गुरुदेव रवींद्रनाथ टागोर, आमच्या सांस्कृतिक वारशासोबत देशबांधवांना पुन्हा एकदा जोडत होते, तर दुसरीकडे डॉ बाबासाहेब आंबेडकर समानतेच्या आदर्शांचा असा जोरदार पुरस्कार करत होते, जो कित्येक विकसित देशांमध्ये देखील दिसत नव्हता. टिळक आणि गोखले यांच्यापासून ते भगत सिंह आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यापर्यंत; जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल आणि श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यापासून ते कमलादेवी चट्टोपाध्याय यांच्यापर्यंत- अशा अनेक महान व्यक्तिमत्वांनी केवळ एकाच लक्ष्यासाठी झटणे, कष्ट करणे, असे उदाहरण मानवतेच्या इतिहासात इतर कुठेही आढळलेले नाही.
11. माझ्या डोळ्यांसमोर आणखी काही महान व्यक्तींची नावे येत आहेत. पण, माझ्या म्हणण्याचा अर्थ इतकाच आहे की स्वतंत्र भारताच्या विविध कल्पनांनी भारलेल्या अनेक महान नेत्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्याग आणि बलिदानाची अप्रतिम उदाहरणे घालून दिली. स्वातंत्र्य चळवळीवर गांधीजींच्या परिवर्तनवादी विचारांचा सर्वात जास्त प्रभाव पडला आणि त्या काळात त्यांनी कोट्यवधी देशवासीयांच्या जीवन प्रणालीला नवी दिशा दिली हे नि:संशयपणे खरे आहे.
स्त्री-पुरुषहो,
12. लोकशाहीच्या ज्या मार्गावरून आपण आज पुढे चाललो आहोत, त्याचा आराखडा आपल्या संविधान सभेतर्फे तयार करण्यात आला होता. या सभेचे सदस्य असलेल्या आणि संपूर्ण देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अनेक विद्वान व्यक्तींमध्ये हंसाबेन मेहता, दुर्गाबाई देशमुख, राजकुमारी अमृत कौर तसेच सुचेता कृपलानी यांच्यासह एकूण 15 स्त्रियांचा समावेश होता. संविधान सभेतील सदस्यांच्या अनमोल योगदानातून निर्माण झालेली भारताची राज्यघटना आपल्याकरिता एक प्रकाश-स्तंभ आहे आणि यात विहीत केलेले आदर्श अनादी काळापासून संरक्षित भारतीय जीवन मूल्यांचा भाग आहेत.
13. राज्यघटनेचा स्वीकार करण्याचा एक दिवस आधी संविधान सभेत केलेल्या निरोपाच्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकशाहीतील, सामाजिक आणि राजकीय परिमाणांमधील फरक स्पष्ट केला होता. ते म्हणाले होते की आपल्याला फक्त राजकीय स्वरुपाची लोकशाही स्थापन करुन समाधानी होता येणार नाही. मी त्यांचेच शब्द तुमच्यासमोर मांडतो. ते म्हणाले होते, “आपल्याला आपल्या राजकीय लोकशाहीला एक सामाजिक लोकशाही म्हणून देखील आकार दिला पाहिजे. राजकीय लोकशाही जर सामाजिक लोकशाहीवर आधारित नसेल ती टिकू शकणार नाही. सामाजिक लोकशाही म्हणजे तरी काय?तर सामाजिक लोकशाही म्हणजे जीवनाची अशी पद्धत जी स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाला जीवनाचे सिद्धांत म्हणून मान्यता देते. स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाच्या सिद्धांतांना एका त्रिमूर्तीचे वेगवेगळे भाग समजता कामा नये. या त्रिमूर्तीचा खरा अर्थ असा आहे की त्यातील कोणत्याही एका सिद्धांताला बाकीच्यांपासून वेगळे केले तर लोकशाहीचा मूळ उद्देशच हरवून जातो.”
माझ्या प्रिय देशवासियांनो,
14. जीवन मूल्यांची ही त्रिमूर्ती आदर्शयुक्त, औदार्यपूर्ण आणि प्रेरणादायी आहे. या त्रिमूर्तीला केवळ अमूर्त संकल्पना समजणे चुकीचे ठरेल. फक्त आपला आधुनिक इतिहासच नव्हे तर आपला प्राचीन इतिहास देखील याच गोष्टीची साक्ष देतो की ही तिन्ही जीवनमूल्ये आपल्या जीवनाचे सत्य आहेत; ही मूल्ये आपण नक्कीच प्राप्त करू शकतो आणि खरेतर वेगवेगळ्या युगांमध्ये त्यांची प्राप्ती देखील करण्यात आली आहे. आपले पूर्वज आणि आधुनिक भारताची उभारणी करणारे आपले देशवासी यांनी त्यांचे कठोर परिश्रम आणि सेवा भावनेच्या मार्गाने न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाच्या आदर्शांना साकार केले होते. आपल्याला केवळ त्यांच्या पाऊलखुणांवरून चालायचे आहे आणि पुढे जायचे आहे.
15. आता असा प्रश्न उभा राहतो की विद्यमान काळाच्या संदर्भात एका सामान्य नागरिकासाठी या आदर्शांचा अर्थ काय आहे? या आदर्शांचा मुख्य उद्देश सामान्य व्यक्तीसाठी सुखी जीवनाचा मार्ग विस्तृत करणे हा आहे असे मला वाटते. म्हणूनच, सर्वप्रथम, सामान्य लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण केल्या पाहिजेत. आपल्या देशात आता साधनसंपत्तीची टंचाई नाही. प्रत्येक कुटुंबाकडे उत्तम घर, पिण्याचे पाणी तसेच वीज यांची सोय उपलब्ध असावी या करिता आपण काम करत आहोत. विकासाचा वाढता वेग आणि भेदभावविरहित सुशासनामुळेच हा बदल घडू शकतो.
16. मूलभूत गरजा पूर्ण केल्यानंतर, प्रत्येक नागरिकाने त्याच्या क्षमतांचा वापर करून आनंदी होण्याचे मार्ग शोधणे आणि आपल्या सर्वस्वी व्यक्तिगत गुणांचा योग्य वापर करून आपले भविष्य घडविणे या बाबींची सुनिश्चिती करणे आवश्यक आहे. या दिशेने प्रगती करण्यासाठी शिक्षण हे मुख्य साधन आहे. युवा भारतीयांना त्यांच्या परंपरांशी जोडण्यासाठी तसेच एकविसाव्या शतकात स्वतःच्या पायांवर ठामपणे उभे राहण्यासाठी नवे ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण’ अत्यंत उपयुक्त ठरेल असा विश्वास मला वाटतो. त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना उत्तम आरोग्य सेवा मिळणे गरजेचे आहे. कोविडच्या जागतिक महामारीने सार्वजनिक आरोग्य सेवेच्या मूलभूत आराखड्यात अधिक सुधारणा करण्याच्या गरजेला अधोरेखित केले आहे. आणि सरकारने या कामाला सर्वोच्च प्राधान्य दिले याचा मला आनंद वाटतो. शिक्षण आणि आरोग्य सेवांचा लाभ घेऊन आपले देशवासी सक्षम होऊ शकतील आणि आर्थिक सुधारणांचा उपयोग करून घेऊन आपले आयुष्य घडविण्यासाठी सर्वोत्तम मार्ग स्वीकारू शकतील. एकविसाव्या शतकाला भारताचा प्रभाव असणारे शतक म्हणून आकार देण्यासाठी आपला देश सक्षम होतो आहे असा ठाम विश्वास मला वाटतो.
प्रिय देशवासियांनो,
17. माझ्या पाच वर्षांच्या कार्यकाळात मी माझ्या संपूर्ण क्षमतेनुसार माझ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. डॉ.राजेंद्रप्रसाद, डॉ.एस.राधाकृष्णन आणि डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्यासारख्या महान व्यक्तिमत्त्वांचा उत्तराधिकारी म्हणून मी अत्यंत जागरूक राहिलो. जेव्हा मी राष्ट्रपती भवनात प्रवेश केला तेव्हा, माझे तत्कालीन पूर्वसुरी प्रणव मुखर्जी यांनी देखील राष्ट्रपती म्हणून असलेल्या माझ्या कर्तव्यांबाबत मला अत्यंत उपयुक्त सूचना दिल्या. तरीही जेव्हा, जेव्हा माझ्या मनात कोणत्याही प्रकारचा संभ्रम निर्माण झाला त्या परिस्थितीत मी गांधीजींचा आणि त्यांनी सुचविलेल्या मार्गदर्शक सूचनांचा आधार घेतला. गांधींजींच्या सल्ल्यानुसार, सर्वात उत्तम मार्गदर्शक सिद्धांत हा आहे की, अशावेळी आपण सर्वात गरीब माणसाचा चेहरा डोळ्यांसमोर आणावा आणि स्वतःलाच असा प्रश्न विचारावा की आपण जो निर्णय घेत आहोत तो या गरीब माणसासाठी योग्य ठरेल का? गांधीजीच्या सिद्धांतांवर असलेल्या माझ्या विश्वासाचा पुनरुच्चार करत मी तुम्हा सर्वांना हा आग्रह करू इच्छितो की दररोज काही मिनिटांसाठी का होईना, तुम्ही गांधीजीचे जीवन आणि शिकवणींचे जरूर चिंतन करावे.
प्रिय देशवासियांनो,
18. आपणा सर्वांसाठी मातेप्रमाणे पूजनीय असलेल्या निसर्गाला सध्या अत्यंत त्रासदायक परिस्थतीचा सामना करावा लागत आहे. हवामान बदलाच्या रूपातील संकटाने आपल्या पृथ्वीच्या भविष्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. आपल्याला पुढील पिढ्यांसाठी आपले पर्यावरण, भूमी, हवा और पाण्याचे संरक्षण करणे गरजेचे आहे. आपली दिनचर्या तसेच दैनंदिन आयुष्यातील गोष्टींचा वापर करताना आपल्याला आपले वृक्ष, नद्या, समुद्र आणि पर्वतांसोबतच इतर सर्व जीव-जंतूंच्या, प्राण्यांच्या संरक्षणासाठी अत्यंत सावध राहण्याची आवश्यकता आहे. भारत देशाचा प्रथम नागरिक म्हणून मला माझ्या देशवासियांना हाच सल्ला द्यायचा आहे.
19. माझे भाषण संपवताना मी पुन्हा एकदा माझ्या देशवासीयांच्या प्रती मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो. भारतमातेला आदरपूर्वक नमन करून मी तुम्हा सर्वांच्या उज्ज्वल भविष्याची कामना करतो.
धन्यवाद,
जय हिंद!
***