नागपूर, 24 जुलै 2022 : सावनेर धापेवाडा गोंडखैरी या रस्त्याच्या चौपदरीकरणात असलेल्या उड्डाणपुलावर तसेच अंडरपास किंवा आरोबीच्या बाजूला असलेल्या भिंतींवर विठ्ठल रखुमाई, अदासाचा गणपती त्याचप्रमाणे कोलबा स्वामी यांचा जीवन प्रवास दर्शवणारे चित्र व रोषणाई करून हा मार्ग भक्तिमार्ग तयार करावा. गावाच्या विकासासाठी सर्वांच्या एकात्मिक प्रयत्नांची गरज असून सर्वांनी आपला गाव स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी आज केले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे राष्ट्रीय महामार्ग 547 च्या सावनेर धापेवाडा गोंडखैरीच्या चौपदरीकरण कामाचे लोकार्पण आज त्यांच्या हस्ते धापेवाडा येथील विठ्ठल रुख्मिणी मंदिर परिसरात आयोजित्त कार्यक्रमात झाले त्यावेळी ते बोलत होते याप्रसंगी रामटेकचे खासदार कृपाल तुमाने ,विधान परिषद सदस्य चंद्रशेखर बावनकुळे प्रामुख्याने उपस्थित होते.
गोंडखैरी-सावनेर- अदासा या रस्त्यावर 9 कोटी रुपयाचे लाईट लावण्याचे काम मंजूर झाले असून पुलाच्या सौंदर्यीकरण्यासाठी सुद्धा 40 लाख रुपये मंजूर झाल्याचे गडकरी यांनी यावेळी सांगितलं. नागपूर जिल्ह्यात 50 हजार कोटीच्या कामापैकी 30 हजार कोटींची कामे पूर्ण झाली असून नागपूर शहरात 1 लाख कोटीच्या वर विकास कामे झाले असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे पूर्ण करण्यात आलेल्या कामाची माहिती उपस्थितांना दिली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण द्वारे केल्या जाणाऱ्या कामातून निघालेल्या मातीचे रस्ते बांधकामात उपयोग होत असून त्यामुळे तयार झालेल्या खोलीकरणातून तसेच शेततळ्यातून जलसंवर्धन सुद्धा मोठ्या प्रमाणात होत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. नागपूरचे रेल्वे स्टेशन विस्तारीकरण कामाचे भूमीपूजन लवकरच रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमातच नागपूरला विदर्भातील इतर शहराशी जोडण्याच्या ब्रॉडगेज रेल्वे प्रकल्पाचा कराराचीसुद्धा अंमलबजावणी होणार आहे अशी माहिती त्यांनी दिली.
राष्ट्रीय महामार्ग 547 ई च्या सावनेर धापेवाडा गोंडखैरी चौपदरीकरणाची एकूण लांबी 28.88 किलोमीटर असून यासाठी 720 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. या रस्त्याच्या बांधकामामुळे विदर्भाचे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धापेवाडा येथील विठ्ठल रुख्मिणी मंदिर तसेच अदासा येथील गणेश मंदिर या तीर्थ स्थळांपर्यंत पोहोचण्यासाठी सुविधा मिळणार आहे. या रस्त्यावर बांधलेल्या रेल्वे ओव्हर ब्रिज, अंडरपास मुळे कळमेश्वर शहर तसेच नागपूर शहरातून सावनेर कळमेश्वर कडे येणाऱ्या वाहतूक कोंडीतून सुटका मिळणार आहे. या रस्त्याच्या बांधकामामध्ये 2.4 किलोमीटर लांबीचा एक रेल्वे उड्डाणपूल त्याचप्रमाणे 3 अंडर पासेस आणि 1 ओवरपास याचा सुद्धा समावेश आहे. या रस्त्यामुळे मुंबई ते इंदूर ही वाहतूक सुद्धा नागपूर शहरातून सुगम रित्या होणार आहे.
याप्रसंगी बोलताना रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांनी सांगितल की एकादशीला येथे येणाऱ्या भाविकांना सोयी होण्यासाठी खासदार निधीतून 14 लाख रुपयाच्या सोलर पॅनलेच्या कामासाठी तरतूद करण्यात आली आहे.
विधानपरिषद सदस्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी धापेवाडा येथे येणाऱ्या भाविकांसाठी पावसाळाच्या दिवसात थांबण्यासाठी एक शेड मंजूर करावे अशी मागणी केली.
नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोक सुर्यवंशी यांनी धापेवाडा मंदीर सुशोभिकरण प्रकल्पा अंतर्गत रस्ते विकास, सांडपाणी प्रक्रीया प्रकल्प तसेच नदी घाट सौंदर्यीकरण याविषयी माहिती दिली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक अभिजित जिचकार यांनी केलं .या कार्यक्रमाला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, धापेवाडाचे ग्रामस्थ स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.