मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर शिवसेना पुरती दुभंगली. शिवसेनेचे तब्बल 40 आमदार एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावं लागलं. महाविकास आघाडी सरकार कोसळलं. राज्यात अनपेक्षितपणे एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वात नवं सरकार आलं. त्यानंतर शिवसेनेचे 12 खासदारही एकनाथ शिंदे यांच्या गटात सामिल झाले. आता ठाकरे आणि शिंदे यांच्यात शिवसेना कुणाची? शिवसेनाभवन कुणाचं? आणि धनुष्यबाण कुणाचा? यावरुन संघर्ष सुरु झालाय. शिवसेना आणि धनुष्यबाण टिकवण्यासाठी, संघटना टिकवण्यासाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याकडून जोरदार प्रत्यत्न सुरु आहेत. त्यासाठी शिवसंवाद यात्रा काढली जातेय. या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. त्याचा टीझर आज संजय राऊत यांनी ट्वीट केलाय. ही मुलाखत स्फोटक आणि खळबळजनक असल्याचा दावा संजय राऊत यांनी केलाय. महत्वाची बाब म्हणजे या मुलाखतीच्या टीझरमध्ये उद्धव ठाकरे यांनी कपाळावर जो विश्वासघाताचा शिक्का लागलाय तो पुसता येणार नाही, अशा शब्दात एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांवर हल्ला चढवल्याचं पाहायला मिळत आहे.
…की महाविकास आघाडीचा प्रयोगच चुकला?
साधारण 45 मिनिटांचा हा टीझर आहे. त्यात संजय राऊत राज्यातील राजकीय स्थितीबाबत उद्धव ठाकरे यांनी थेट सवाल करताना दिसत आहेत. राऊतांच्या प्रत्येक प्रश्नाला उद्धव ठाकरेंही त्याच जोमात आणि ठाकरे शैलीत उत्तर देताना पाहायला मिळत आहे. या टीझरमध्ये संजय राऊतांनी विचारलेल्या प्रश्नांमध्ये, निवडणूक आयोगापुढे एक नवीन खटला उभा राहतोय, धनुष्यबाण कुणाचा? ठाकरेंना पुरावे द्यावे लागत आहेत शिवसेना खरी किंवा खोटी, आज जी फूट दिसतेय शिवसेनेत, याआधी राणे, भुजबळांनाही पाडता आली नव्हती, नक्की काय चुकलं असावं आपलं, की महाविकास आघाडीचा प्रयोगच चुकला? अशा प्रश्नांचा समावेश आहे. दरम्यान, 26 आणि 27 जुलैला उद्धव ठाकरे यांची ही मुलाखत प्रदर्शित होणार आहे.