मुंबई : आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी-ग्रुप व ओम्नी ग्लोबल स्पोर्ट्स मॅनेजमेंट आयोजित ओम्नी ट्रॉफी आंतर हॉस्पिटल बी डिव्हिजन टी-२० क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकाविताना नानावटी हॉस्पिटलने जसलोक हॉस्पिटलचे आव्हान ८ विकेटने संपुष्टात आणले. अर्धशतकवीर प्रतिक पाताडे, फरहान काझी, किशोर केयुस्कर, ओंकार जाधव यांचा खेळ नानावटी हॉस्पिटलला अजिंक्यपदासाठी उपयुक्त ठरला. कप्तान नितीन सोळंकी, सचिन तोडणकर, रोहित जाधव, प्रवीण मोरजकर यांनी पराभव टाळण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करूनही जसलोक हॉस्पिटलला अंतिम उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. विजेत्या-उपविजेत्यांना ओम्नी कंपनीचे डायरेक्टर क्रिकेटपटू ओमकार मालडीकर, आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीचे कार्याध्यक्ष गोविंदराव मोहिते, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले.
अंतिम फेरीमध्ये नाणेफेक जिंकून जसलोक हॉस्पिटलने नानावटी हॉस्पिटल विरुध्द माहीम ज्युवेनील-शिवाजी पार्क खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी स्वीकारली. प्रारंभी रोहित जाधवने (१३ चेंडूत १७ धावा, ३ चौकार) दमदार फलंदाजी करूनही जसलोक हॉस्पिटलची सातव्या षटकाला ४ बाद ३५ धावा अशी नाजूक स्थिती स्पिनर फरहान काझी (२५ धावांत ३ बळी) व कप्तान प्रतिक पाताडे (१२ धावांत २ बळी) यांच्या गोलंदाजीने केली. तरीही न डगमगता सचिन तोडणकर (३४ चेंडूत ४५ धावा, ६ चौकार), प्रवीण मोरजकर (२७ चेंडूत १७ धावा) आदी फलंदाजांनी जसलोक हॉस्पिटलला मर्यादित २० षटकामध्ये ७ बाद १२९ धावांचा टप्पा गाठून दिला. विजयी लक्ष्याचा पाठलाग करतांना अष्टपैलू प्रतिक पाताडे (४८ चेंडूत नाबाद ५६ धावा, १ षटकार व ३ चौकार), किशोर कुयेस्कर (४५ चेंडूत ३८ धावा, २ चौकार), दिनेश पवार (८ चेंडूत नाबाद १७ धावा) यांच्या आक्रमक फलंदाजीमुळे नानावटी हॉस्पिटलने १८.३ षटकात विजयी २ बाद १३० धावा फटकाविल्या आणि आंतर हॉस्पिटल ओम्नी ट्रॉफी बी डिव्हिजनच्या अजिंक्यपदास गवसणी घातली. बी डिव्हिजन स्पर्धेमध्ये सर्वोत्तम अष्टपैलू क्रिकेटपटू प्रतिक पाताडे, उत्कृष्ट गोलंदाज नितीन सोळंकी तर उत्कृष्ट फलंदाज ओंकार जाधव व सचिन तोडणकर ठरले. रुग्णालयीन खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी क्रिकेटपटू ओमकार मालडीकर यांनी १ फेब्रुवारीपासून ओम्नी ट्रॉफी इंटर हॉस्पिटल चॅम्पियनशिप क्रिकेट स्पर्धा तर क्रीडा संघटक गोविंदराव मोहिते यांनी १ मार्चपासून अमृत महोत्सवी आरएमएमएस ट्रॉफी इंटर हॉस्पिटल क्रिकेट स्पर्धा जाहीर केल्या आहेत.