शिवनेरतर्फे आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी, अभ्युदय स्पोर्ट्स व यशस्विनी योजना सहकार्याने माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित विनाशुल्क शालेय सुपर लीग कबड्डीच्या मुख्य साखळी लढती २१ व २२ डिसेंबर रोजी बांदल क्रीडांगण-डॉकयार्ड येथे होणार आहेत. शालेय सुपर लीग कबड्डी स्पर्धेमधील चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स लढतीसाठी अँटोनिओ डिसोझा हायस्कूल-भायखळा, ताराबाई मोडक हायस्कूल-दादर, सरस्वती विद्या मंदिर-भटवाडी, अफॅक इंग्लिश स्कूल-चेंबूर असे विभागवार विजेते पात्र शालेय संघ अजिंक्यपद पटकाविण्यासाठी सज्ज झाले आहेत.
शिवनेर संघटन समितीचे अध्यक्ष खा. सुनील तटकरे, कार्याध्यक्ष नरेंद्र वाबळे, सेक्रेटरी लीलाधर चव्हाण यांच्या प्रयत्नामुळे शालेय खेळाडूंना तज्ञ प्रशिक्षकांचे मार्गदर्शनासह प्राथमिक फेरीचे चार विभागवार कबड्डी सामने विनाशुल्क उपक्रमाद्वारे मुंबापुरीत संपन्न झाले. विभागवार विजेते संघ सुपर लीग पद्धतीच्या साखळी सामन्यांद्वारे लढती देतील. त्यानिमित्त २० डिसेंबर रोजी देखील एनआयएस कबड्डी प्रशिक्षक प्रॉमिस सैतवडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय खेळाडूंचे विशेष शिबीर माझगाव येथे संपन्न झाले. सदर उपक्रमाप्रसंगी विख्यात राष्ट्रीय प्रशिक्षक व कबड्डीपटू राणाप्रताप तिवारी यांचा गौरव करण्यात येणार आहे.