मुंबई : शिवनेरतर्फे आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी व यशस्विनी संस्थेच्या सहकार्याने माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शालेय सुपर लीग कबड्डीच्या प्राथमिक तिसऱ्या टप्प्यात सरस्वती विद्या मंदिर, अभ्युदय विद्या मंदिर संघांनी तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. भटवाडी येथील सरस्वती विद्या मंदिरने एस.एम. शेट्टी स्कूल-पवई संघाचा अवघ्या एका गुणाने निसटता पराभव करतांना साहिल सोलनकर व मंथन साटले चमकले. चढाईपटू आदर्श तांबेच्या खेळामुळे अभ्युदय विद्या मंदिर-घाटकोपर संघाने माणेकलाल म्युनिसिपल स्कूलवर १८ गुणांनी विजय मिळविला. प्रशिक्षणासह शालेय कबड्डी स्पर्धेचा अल्पोपहारासह मोफत उपक्रम मुंबईतील चार विभागीय टप्प्यामध्ये क्रीडाप्रेमी नरेंद्र वाबळे, माजी कबड्डीपटू गोविंदराव मोहिते व शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असून प्रत्येक संघातील उत्कृष्ट खेळाडूंना पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे.
यंग स्पोर्ट्स क्लब-घाटकोपर सहकार्यीत माणेकलाल क्रीडांगणामधील पश्चिम विभागीय सामन्यात एस.एम शेट्टी स्कूलने अली कुरेशीच्या अप्रतिम खेळामुळे मध्यंतराला सरस्वती विद्या मंदिरविरुध्द १९-१६ अशी आघाडी घेतली होती. परंतु दुसऱ्या डावात साहिल सोलनकर व मंथन साटले यांनी भराभर गुण घेत सरस्वती विद्या मंदिरला ४२-४१ असा निर्णायक विजय मिळवून दिला. चढाईपटू आदर्श तांबे व शिवराज माने यांच्या सर्वांगसुंदर खेळामुळे अभ्युदय विद्या मंदिरने माणेकलाल म्युनिसिपल स्कूलचे आव्हान ४७-१९ असे संपुष्टात आणून तिसरी फेरी गाठली. माणेकलाल स्कूलच्या राहुल बराईने पूर्वार्धात छान खेळ केला. याप्रसंगी शालेय खेळाडूंना मुख्याध्यापक लक्ष्मण देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक लालासाहेब डाके, क्रीडा शिक्षक रामदास भोकळ, संयोजक लीलाधर चव्हाण आदींचे मार्गदर्शन लाभले होते. शालेय खेळाडूंना राष्ट्रीय कबड्डीपटू व प्रशिक्षक राणाप्रताप तिवारी, राष्ट्रीय दर्जाचे एनआयएस प्रशिक्षक मीनानाथ धानजी, एनआयएस प्रशिक्षक प्रॉमिस सैतवडेकर, क्रीडा शिक्षक अविनाश महाडिक, मार्गदर्शक सुनील खोपकर यांचे प्रशिक्षण लाभणार आहे.
**