अंधेरीच्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी-केडीए हॉस्पिटल संघाने जे.जे. हॉस्पिटल संघाचा ४३ धावांनी पराभव करून ओम्नी ट्रॉफी आंतर हॉस्पिटल ए डिव्हिजन टी-२० क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. सलामीवीर सिध्देश घरत व प्रतिक घरत यांच्या अष्टपैलू खेळामुळे केडीए हॉस्पिटलने अजिंक्यपदाला गवसणी घातली. लीलावती हॉस्पिटलने हिरानंदानी हॉस्पिटल संघावर ३३ धावांनी विजय मिळवून तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळविला. ओम्नी ग्लोबल स्पोर्ट्स मॅनेजमेंटचे संचालक ओमकार मालडीकर, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदी मंडळींच्या उपस्थितीत विजेत्या-उपविजेत्यांना गौरविण्यात आले.
आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी-ग्रुप व ओम्नी ग्लोबल स्पोर्ट्स मॅनेजमेंट आयोजित नवरोज-आझाद मैदान येथील ए डिव्हिजनच्या अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून केडीए हॉस्पिटलने प्रथम फलंदाजी स्वीकारली. सलामीवीर सिध्देश घरत (४७ चेंडूत ५५ धावा), आनंद सुर्वे (३८ चेंडूत २८ धावा) व प्रतिक घरत (२२ चेंडूत ३६ धावा) यांच्या दमदार फलंदाजीमुळे केडीए हॉस्पिटलने मर्यादित २० षटकात ७ बाद १२८ धावा फटकाविल्या. रोहन म्हापणकरने २७ धावांत ३ बळी घेतले. भरवंशांच्या फलंदाजांना लवकर गुंडाळणारी गोलंदाजी सिध्देश घरतने (११ धावांत ५ बळी) केल्यामुळे जे.जे. हॉस्पिटलचा डाव १८.२ षटकात ८५ धावसंख्येवर संपुष्टात आला. परिणामी केडीए हॉस्पिटलने शानदार विजेतेपद पटकाविले.
स्पर्धेतील सर्वोत्तम क्रिकेटपटू सिध्देश घरत, उत्कृष्ट फलंदाज सुभाष शिवगण व प्रतिक घरत तर उत्कृष्ट गोलंदाज रोहन म्हापणकर ठरला. सामनावीर शंकर पंडेरे (२४ चेंडूत ३७ धावा), धर्मेश स्वामी (१५ चेंडूत २१ धावा) व वीरेश दांडेकर ( ३८ चेंडूत ३६ धावा) यांच्या फलंदाजीमुळे लीलावती हॉस्पिटलने १३७ धावांचा पल्ला गाठून हिरानंदानी हॉस्पिटलला १०४ धावसंख्येवर रोखले आणि तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळविला. स्पर्धेनिमित्त रुग्णालयीन क्रिकेटपटू धर्मेश स्वामी, अंकुश जाधव तसेच डॉ. स्वप्नील निसाळ यांचा विशेष गौरव करण्यात आला.