दिल्ली : दिल्ली पोलिसांनी सोमवारी अंगावर शहारे आणणाऱ्या एका हत्याकांडाचा खुलासा केला आहे. 18 मे रोजी म्हणजे जवळपास 6 महिन्यांपूर्वी लिव्ह इन पार्टनर आफताबने आपली 26 वर्षीय प्रेयसी श्रद्धाची अत्यंत निर्दयीपणे हत्या केली. तिचा मृतदेह करवताने कापला. त्यानंतर बाजारातून नवा फ्रिज आणून तिच्या मृतदेहाचे तुकडे त्यात ठेवले. या तुकड्यांचा वास येऊ नये म्हणून तो घरात अगरबत्ती लावत होता.
सलग 18 दिवस मध्यरात्री 2 च्या सुमारास तो घराबाहेर पडून हे तुकडे जंगलात व दिल्लीच्या विविध भागांत फेकत होता. पोलिसांनी शनिवारी आफताबच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर त्याने श्रद्धाच्या हत्येची सनसनाटी कहाणी सांगितली. दुसरीकडे कोर्टाने त्याची 5 दिवसांच्या पोलिस कोठडीत रवानगी केली.
या प्रकरणी पोलिस सूत्रांनी पोलिसाचा दाखला देत एक मोठा खुलासाही केला आहे. पोलिसांच्या मते, आफताबने ही हत्या करण्यापूर्वी अमेरिकन क्राइम शो डेक्स्टरसह अनेक क्राइम मूव्हिज व शो पाहिले होते. त्यानंतर त्याने श्रद्धाचा मर्डर करून तिच्या मृतदेहाचे तब्बल 35 तुकडे केले. त्याने बॉडी पार्ट्स सुरक्षित ठेवण्यासाठी बाजारातून एक मोठे फ्रिजही खरेदी केले होते. तो रोज त्यातील काही तुकडे बाहेर काढत व जंगलात नेऊन फेकत. हा प्रकार तब्बल 18 दिवस सुरू होता.
सायकोलॉजिकल थ्रिलर शो आहे डेक्स्टर
डेक्स्टर एक अमेरिकन क्राइम ड्रामा व सायकोलॉजिकल थ्रिलर शो आहे. तो 2006 ते 2013 दरम्यान प्रसारित झाला होता. त्याचे 8 सीजन आहेत. या कार्यक्रमातील डेक्स्टर मॉर्गन हे प्रमुख पात्र दिवसा पोलिसांसाठी न्यायवैद्यक तंत्रज्ञ म्हणून काम करतो व रात्रीला सीरियल किलर म्हणून पाशवी गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांची हत्या करतो.
आता हा संपूर्ण घटनाक्रम क्रमवारपणे समजून घेऊया…
कोण होती श्रद्धा?
26 वर्षीय श्रद्धा मुंबईच्या मालाडमध्ये राहत होती. ती तिथे एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या कॉल सेंटरमध्ये काम करत होती.
आफताब-श्रद्धा कसे व केव्हा भेटले?
श्रद्धा व आफताब दोघेही कॉल सेंटरमध्ये काम करत होते. तिथेच त्यांची भेट झाली. दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. पण त्यांचे कुटुंबीय त्यांच्यावर नाराज होते. यामुळे ते दोघेही मुंबईहून दिल्लीत शिफ्ट झाले. ते महरौलीच्या एका फ्लॅटमध्ये लिव्ह इनमध्ये राहत होते.
भांडणाला वैतागून खून
साउथ दिल्लीचे अतिरिक्त डीसीपी अंकित चौहान यांनी सांगितले की, 18 मे रोजी आफताबने श्रद्धाची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर त्याने तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे करून फ्रिजमध्ये ठेवले. हे तुकडे घेऊन रोज मध्यरात्री 2 च्या सुमारास तो घराबाहेर पडत होता. हे तुकडे त्यांनी संपूर्ण दिल्लीत वेगवेगळ्या भागांत फेकले होते.
करवताने बॉडी कापून तुकडे केले
पोलिसांच्या माहितीनुसार, आफताबने मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी करवताचा वापर केला. त्याने प्रथम तिच्या हाताचे तीन तुकडे केले. त्यानंतर पायाचेही 3 तुकडे केले. त्यानंतर तो दररोज काही तुकडे बॅगेत भरून दिल्लीत फेकून देत होता.
मुलीने फोन उचलणे बंद केल्यानंतर कुटुंबाने दिल्ली गाठली
18 मेपासून श्रद्धाने कुटुंबाचा फोन उचलणे बंद केले. यामुळे चिंताग्रस्त झालेले तिचे वडील विकास मदान मुलीची विचारपूस करण्यासाठी 8 नोव्हेंबर रोजी दिल्लीला पोहोचले. तिथे तिच्या फ्लॅटला टाळे लागले होते. त्यांनी महरौली पोलिस ठाण्यात मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल केली.
कबुलीजबाब – श्रद्धा लग्नाचा तगादा लावत होती
वडिलांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी शनिवारी आफताबला अटक केली. चौकशीत त्याने आपणच श्रद्धाचा खून केल्याचे मान्य केले. तो म्हणाला – आमच्यात नेहमीच भांडण होत होते. ती लग्नाचा तगादा लावत होती. याला कंटाळून मी तिची हत्या केली. आता पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून श्रद्धाच्या मृतदेहाचा शोध सुरू केला.