मुंबई : अंधेरीच्या केडीए हॉस्पिटलने रहेजा हॉस्पिटलवर १५३ धावांनी मोठा विजय मिळवून ओम्नी ट्रॉफी आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धेमधील लागोपाठ दुसऱ्या साखळी विजयाची नोंद केली. अष्टपैलू प्रतिक घरत (६४ धावा व २ बळी) व सिध्देश घरत (५४ धावा) यांच्या झंझावाती अर्धशतकामुळे केडीए हॉस्पिटलचा विजय सुकर झाला. रहेजा हॉस्पिटलच्या नितेश म्हस्केने (२ बळी) किफायतशीर गोलंदाजी करूनही रहेजा हॉस्पिटल संघाला प्रतिस्पर्ध्याचे द्विशतक आवरता आले नाही. आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी-ग्रुप व ओम्नी ग्लोबल स्पोर्ट्स मॅनेजमेंटतर्फे नवरोज-आझाद मैदानात सुरु असलेल्या स्पर्धेमध्ये अर्धशतकवीर प्रतिक घरत व नितेश म्हस्केला उत्कृष्ट खेळाडूच्या पुरस्काराने क्रिकेटपटू चंद्रकांत करंगुटकर व अविनाश दुधाणे यांनी गौरविले.
प्रतिक घरत (४० चेंडूत ६४ धावा, ९ चौकार), सिध्देश घरत (३२ चेंडूत ५४ धावा, १ षटकार व ६ चौकार), आनंद सुर्वे (२१ चेंडूत ३५ धावा, १ षटकार व २ चौकार) यांच्या दमदार फलंदाजीमुळे केडीए हॉस्पिटलने मर्यादित २० षटकात ५ बाद २०८ धावांचा डोंगर उभारला. नितेश म्हस्केने १७ धावांत प्रमुख २ बळी घेतले. विजयासाठी २०९ धावांच्या अवघड लक्ष्याच्या दडपणाखाली रहेजा हॉस्पिटलची फलंदाजी बहरली नाही. देवेंद्र भानसे (५ धावांत ४ बळी), प्रतिक घरत (८ धावांत २ बळी), हितेश विघावे (११ धावांत २ बळी) यांच्या प्रभावी गोलंदाजीमुळे रहेजा हॉस्पिटलचा डाव १६ षटकांमध्ये अवघ्या ५५ धावांत कोसळला. परिणामी केडीए हॉस्पिटलने विजयी आगेकूच करताना १५३ धावांनी साखळी अ गटातील दुसरा सामना जिंकला. अविनाश डांगळे (१४ चेंडूत १३ धावा, २ चौकार) व चेतन सुर्वे (१६ चेंडूत १२ धावा, २ चौकार) यांनी छान प्रतिकार केला.
**************************