मुंबई : ओम्नी ट्रॉफी आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धेत जेजे हॉस्पिटलने बलाढ्य जसलोक हॉस्पिटलवर ९ विकेटने मोठा विजय मिळवून साखळी ड गटात प्रथम स्थान पटकाविण्याचे संकेत दिले आहेत. सामनावीर सुभाष शिवगण (नाबाद ४१ धावा व १ बळी), सलामीवीर अभिजित मोरे (३४ धावा व १ बळी) व रोहन म्हापणकर (नाबाद १० धावा व ३ बळी) यांच्या अष्टपैलू कामगिरीमुळे जेजे हॉस्पिटलने पहिला साखळी सामना आरामात जिंकून दोन गुण वसूल केले.
जसलोक हॉस्पिटलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्विकारली. सलामीवीर सचिन दुधवडकर (३६ चेंडूत ३५ धावा, ४ चौकार) व त्यानंतर भूषण कदम (३५ चेंडूत नाबाद ३३ धावा, ३ चौकार) यांनी जसलोक हॉस्पिटलतर्फे उत्तम फलंदाजी करूनही जेजे हॉस्पिटलच्या सर्वच गोलंदाजांनी ठराविक अंतराने विकेट घेणारी अचूक गोलंदाजी केली. परिणामी जसलोक हॉस्पिटलचा डाव २० षटकात ८ बाद ९९ धावसंख्येवर थबकला. रोहन म्हापणकर (१७ धावांत ३ बळी) व जगदीश वाघेला (१७ धावांत २ बळी) यांनी प्रमुख फलंदाजांना तंबूची दिशा दाखविली.
सलामीवीर अभिजित मोरे (४२ चेंडूत ३४ धावा, १ षटकार व २ चौकार) व सुभाष शिवगण (४६ चेंडूत नाबाद ४१ धावा, ६ चौकार) यांनी धावफलक सतत हलता ठेऊन ८३ धावांची सलामी भागीदारी केली. त्यामुळे जसलोक हॉस्पिटलचे गोलंदाज हतबल झाले. परिणामी जेजे हॉस्पिटलने १६ व्या षटका अखेर विजयी चौकारासह १ बाद १०२ धावा फटकावून सामना जिंकला. आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी-ग्रुप आणि ओम्नी ग्लोबल स्पोर्ट्स मॅनेजमेंट तर्फे ही स्पर्धा नवरोज खेळपट्टी-आझाद मैदान येथे सुरु आहे.
******************************