पाकिस्तानचा सलग दुसरा पराभव
अवघ्या एका धावेने झिम्बाबेच्या संघाने पाकिस्तानचा पराभव करत यंदाच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेमधील एका धक्कादायक निकालाची नोंद केली आहे. रविवारी (२३ ऑक्टोबर २०२२ रोजी) झालेला भारताविरुद्धचा सामनाही पाकिस्तानने शेवटच्या चेंडूवर गमावला होता. त्यानंतर आज अवघ्या १३१ धावांचं लक्ष्यही पाकिस्तानला १२० चेंडूंमध्ये पूर्ण करता आलं आहे. पाकिस्तानला निर्धारित २० षटकांमध्ये १२९ धावांपर्यंत मजल मारता आली.
पाकिस्तानचा हा सुपर १२ मधील दुसरा पराभव असून आता त्यांची उपांत्यफेरीसाठी पात्र ठरण्याची धुरस शक्यता आहे. मात्र पाकिस्तान या स्पर्धेतून बाहेर पडला आहे असं म्हणता येणार नसलं तरी एक गोष्ट निश्चित आहे की पाकिस्तानचा या स्पर्धेतील पुढील प्रवास आता भारतीय संघाच्या कामगिरीवरही अवलंबून असणार आहे. सध्याची परिस्थिती पाहता पाकिस्तान या स्पर्धेतून जवळजवळ बाहेर पडल्याचं चित्र प्रथमदर्शनी दिसत असलं तरी सारा खेळ आता नेटरनरेट आणि जर तरच्या शक्यतांवर आहे.
झिमबाब्वेने दिलेलं १३१ धावाच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानी फलंदाजी गडगडली. वेळेवेळी खेळाडू माघारी परतत राहिल्याने पाकिस्तानचा संघ या कमी धावसंख्येच्या सामन्यामध्येही तणावाखाली आला आणि त्यातच त्यांचा पराभव झाला. पाकिस्तानच्या या पराभवामुळे ते सध्या गुणतालिकेमध्ये तळाशी फेकले गेले आहेत. पाकिस्तानच्या खात्यावर शून्य गुण आहे. दुसऱ्या गटामध्ये भारत अव्वल स्थानी आहे. त्या खालोखाल दक्षिण आफ्रिकेचा संघ आहे. मात्र कालच्या सामन्यात मोठा विजय मिळवल्याने दक्षिण आफ्रिकेचं नेट रनरेट भारतापेक्षा अधिक आहे. झिम्बाबवेचा संघ पाकिस्तानवर विजय मिळवल्याने तिसऱ्या स्थानी आला आहे. तर बांगलादेशचा संघ चौथ्या स्थानी आहे. पाकिस्तानचा संघ पाचव्या आणि नेदरलॅण्ड्सचा संघ सहाव्या स्थानी म्हणजे तळाशी आहे. पाकिस्तान आणि नेदरलॅण्ड्सला एकही सामना जिंकता आलेला नाही.
पाकिस्तानचं तिकीट भारताच्या हाती कसं?
पाकिस्तानचं नेमकं कुठे चुकलं आणि त्यांची पुढील फेरीमध्ये पात्र होण्याची शक्यता किती आहे यासंदर्भात सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. “पाकिस्तानची गोलंदाजी ही ऑस्ट्रेलियन वातावरणामध्ये प्रभावी आणि खास करुन पर्थसारख्या ठिकाणी तर फारच उत्तम आहे. मात्र त्यांच्या फलंदाजीमध्ये बऱ्याच उणीवा आहेत. वेगवान गोलंदाज आणि उसळते चेंडू त्यांना खेळता येत नाहीत. या सामन्यामध्येही हेच दिसून आलं. आता उपांत्यफेरीमध्ये पात्र ठरण्याची शक्यता केवळ १० टक्के उरली आहे,” असं फ्रेडी वाइल्डी यांनी म्हटलं आहे. फ्रेडी हे क्रिकेटसंदर्भातील आकडेवारीचे तज्ज्ञ आहेत. ते क्रिकवीझसाठी काम करतात.
आता पाकिस्तान उपांत्यफेरीसाठी पात्र ठरणार की नाही हे फार गुंतागुंतीचं झालं आहे असंही फ्रेडी यांनी पुढील ट्वीटमध्ये म्हटलं आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानचं उपांत्यफेरीचं तिकीट आता भारताच्या हातात आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. भारताच्या कामगिरीवर पाकिस्तानला अप्रत्यक्षपणे अवलंबून रहावं लागणार आहे. “पाकिस्तानचा उपांत्यफेरीमध्ये जाण्याचा मार्ग फारच गोंधळात टाकणारा झाला आहे. खरं सांगायचं तर त्यांना आता दक्षिण आफ्रिकेला पराभूत करावं लागेल. त्यानंतर भारत दक्षिण आफ्रिकेला पराभूत करेल या आशेवर जगावं लागेल. तसेच झिम्बॉब्वेने बांगलादेश किंवा नेदरलॅण्ड्सविरोधातील सामन्यापैकी एका सामन्यामध्ये पराभूत होण्याची वाट पहावी लागेल,” असं फ्रेडी यांनी म्हटलं आहे.
इंग्लंडला आयर्लंण्डने पराभूत केल्यानंतरचा झिम्बबवेचा पाकिस्तानवरील हा विजय दुसरा सर्वात धक्कादायक निकाल मानला जात आहे. त्यामुळे आता पाकिस्तान पुढील फेरीत जाणार की नाही हे त्यांच्या खेळाबरोबरच ग्रुपमधील इतर संघाच्या खेळावरही अवलंबून राहणार आहे. दोन्ही गटांमधील अव्वल दोन संघ उपांत्यफेरीसाठी पात्र ठरणार आहेत.