एआयपीएमएचा निष्कर्ष
मुंबई, दि.27 (प्रतिनिधी) : उद्योगाचा आकार येत्या ६-७ वर्षांत तिप्पट होण्याची शक्यता, त्यामुळे कर्मचाऱ्यांना प्रचंड मागणी येण्याची चिन्हे आहे. रबर, केमिकल आणि पेट्रोकेमिकल स्किल डेव्हलपमेंट कौन्सिल’ या तिन्ही क्षेत्रांसाठीच्या ‘सेक्टर स्किल कौन्सिल’ने प्लास्टिक क्षेत्रासंबंधी आपल्या पहिल्या विशेष कौशल्य मेळाव्याचे आयोजन नुकतेच मुंबईत केले होते. ‘ऑल इंडिया प्लास्टिक मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन’, त्याचे ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ ‘एएमटीईसी’ आणि ‘नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने देशातील प्लास्टिक उद्योगांचे केंद्र असलेल्या मुंबईत हा मेळावा घेण्यात आला.
पुढील ६-७ वर्षांत आपली उलाढाल तिपटीने वाढवून ती १० लाख कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट प्लास्टिक उद्योगाने ठेवले आहे. या उद्योगाने आयातीस पर्याय निर्माण करावा व निर्यातही वाढवावी, जेणेकरून उद्योगाचा आकार वाढेल व त्यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल, असे आवाहन वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी नुकतेच केले होते. सध्या देशात प्लास्टिक वस्तूंची आयात वर्षाला ४५,००० कोटी रुपयांच्या घरात आहे, त्यामुळे आयातीस पर्याय निर्माण करण्यास आणि पुढील ६-७ वर्षांत ५० लाख लोकांना रोजगार मिळण्यास प्रचंड वाव आहे.
‘आरसीपीएसडीसी’चे अध्यक्ष विनोद पटकोटवार, ‘एआयपीएमए’चे प्रमुख किशोर पी संपत, ‘एआयपीएमए’च्या ‘एएमटीईसी’चे अध्यक्ष अरविंद मेहता आणि ‘एनएसडीसी’च्या राज्यीय कामकाज विभागाचे राष्ट्रीय प्रमुख सोबिन्स कुरियाकोसे हे या कौशल्य मेळाव्यामध्ये प्रमुख वक्ते होते.