मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत आता हळूहळू माजी नगरसेवक परतत असल्याचं दिसून येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कॅम्पमध्ये दाखल झालेले ठाण्यातील दोन माजी नगरसेवक- अंकिता पाटील आणि नरेश मणेरा नुकतेच परतले आहेत.
बंडाळीनंतर ठाकरे यांच्या गटाला मुख्यमंत्री शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे येथून प्रथमच पाठिंबा मिळाला आहे.
तत्पूर्वी माजी नगरसेविका ज्योत्साना दिघे यांनीही भारतीय जनता पक्षातून (भाजप) ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला होता. पाटील म्हणाले, ‘काही लोकांनी आमच्या मनात संभ्रम निर्माण केला. मात्र आता आम्ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहोत. गेल्या आठवड्यात आम्ही त्यांना भेटलो होतो”. ठाण्याचे माजी उपमहापौर मणेराही ठाकरे कॅम्पमध्ये परतले. मात्र, ते म्हणाले, मी ठाकरेंना कधीच सोडले नाही.
ठाण्यातील बहुतांश माजी नगरसेवकांनी ६ जून रोजी शिंदे यांची भेट घेतली होती. शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांच्या पत्नी नंदिनी वगळता ठाण्यातील सर्व नगरसेवकांनी बंडखोरी करताना आपल्याला पाठिंबा दिल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर आता ठाकरेंनी शिंदेंना ठाण्यात धक्के द्यायला सुरुवात केली आहे.