मुंबई : गणेशोत्सवापाठोपाठ नवरात्रोत्सव मंडळांवरही भाजपने पकड मिळविली असून मुंबईत तीनशे ठिकाणी दांडिया, भोंडला आणि गरब्याचा खेळ होणार आहे. ४९ ठिकाणी तर थेट भाजपतर्फे गरबा, दांडिया आणि भोंडला याचे आयोजन केले जाणार आहे. त्याची जबाबदारी नगरसेवकांपासून खासदारांपर्यंत देण्यात आली आहे.
सतरा ठिकाणी भव्य स्वरूपात
गणेशोत्सवाप्रमाणेच यंदाचा नवरात्रोत्सव देखील भारतीय जनता पार्टीतर्फे उत्साहात साजरा केला जाणार आहे. ४९ ठिकाणी थेट भाजपतर्फे गरबा, दांडिया आणि भोंडला याचे आयोजन केले जाणार आहे. तसेच भाजपाने विविध मंडळांना पुरस्कृत केले आहे. २४२ मंडळे ३०० ठिकाणी “उदे गं अंबे उदे”चा नारा भारतीय जनता पार्टी देणार आहे. तसेच भाजपतर्फे मुंबईत १७ ठिकाणी दांडिया, भोंडलाचे भव्य स्वरुपात आयोजन करण्यात आले असून याठिकाणी दांडिया फेम कलाकरांची उपस्थिती असणार आहे, अशी माहिती भाजप आमदार अॅड. आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला माजी आमदार राज पुरोहित, अतुल शाह आणि मुंबई महापालिकेचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे उपस्थित होते.
शेवटचे तीन दिवस बारा वाजेपर्यंत
वांद्रे येथे रंगशारदात घेतलेल्या पत्रकार परिषदेत शेलार म्हणाले की, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली आहे की, दोन वर्षांनंतर तरुण-तरुणी दांडियाचा आनंद घेत आहेत. त्यामुळे किमान तीन दिवस तरी दांडियाची १० वाजेपर्यंतची मर्यादा थोडी उशिरापर्यंत १२ वाजेपर्यंत करण्याची मागणी करण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत यावर निर्णय होईल, अशी आम्हाला आशा आहे. मुंबईकरांना माझे आवाहन आहे की, मुंबईकरांनी आम्ही आयोजित केलेल्या उत्सवात सामील व्हावे.
मुंबई भाजपा आयोजित आणि गोपाळ दळवी यांच्या पुढाकाराने काळाचौकी येथे भव्य मराठी दांडिया उत्सव आयोजित केला जाणार आहे. याठिकाणी सुप्रसिद्ध गायक, संगीतकार अवधूत गुप्ते यांच्यासह अनेक कलाकार उपस्थित राहणार आहेत.
आमदार सुनील राणे हे योगी नगर, कच्छी नगर येथे आयोजित करणाऱ्या उत्सवात दहा हजार जणांचा रोज सहभाग असेल. त्याठिकाणी कलाकार किंजल दवे आपली कला सादर करतील.
आमदार प्रवीण दरेकर हे हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे मनोरंजन उद्यान, बोरिवली पश्चिम येथे कलाकार प्रीति – पिंकी यांच्या उपस्थितीत गरब्याचे आयोजन करतील.
खासदार गोपाळ शेट्टी आणि पदाधिकारी संतोष सिंग हे प्रमोद महाजन क्रीडांगण, बोरीवली पूर्व येथे प्रसिद्ध दांडिया क्विन फाल्गुनी पाठक यांच्या सहभागाने गरबा साजरा करतील.
खासदार मनोज कोटक हे कालिदास ग्राउंड, मुलुंड याठिकाणी सुप्रसिद्ध वादक हनीफ असलम, जान्हवी श्रीमनकर, भाविन शास्त्री यांना घेऊन नवरात्रोत्सवाचे आयोजन करतील.
आमदार अमित साटम हे जूहू येथील JVPD स्कीम येथे दांडियाचे आयोजन करणार आहेत.
तसेच आमच्यातर्फे धर्मवीर संभाजी नगर उद्यान, मिलन सब वे येथे अरविंद कुमार आणि गायिका दिपांशी यांना घेऊन दांडियाचे आयोजन करणार आहे, अशी माहिती आशिष शेलार यांनी दिली.
●माजी नगरसेवक भार्गव पटेल, हॉटेल सहारा स्टार, ● माजी नगरसेवक विनोद शेलार हे पावटे कंपाउंड, मालाड, ● आमदार अतुल भातखळकर हे अशोक नगर कांदिवली, ● आमदार कॅप्टन तमिल सेलवम हे CGS कॉलनी सायन ● संतोष मेढेकर हे मेघवाडी जोगेश्वरी ● देवांग दवे हे ठाकूर व्हिलेज ● दीपक दळवी हे भांडूप● माजी नगरसेवक नील सोमैया हे निलम नगर● माजी नगरसेवक मुरजी पटेल हे शेर ए पंजाब ● माजी नगरसेवक मंगेश पवार यांच्यातर्फे आदिशक्ती एकविरा माता क्रीडांगण, भांडूप गाव येथे● तर माजी नगरसेवक महेश पारकर हे शासकीय वसाहत, बांद्रा पूर्व येथे गरबा तसेच दांडियाचे आयोजन करणार आहेत.
या पत्रकार परिषदेला माजी आमदार राज पुरोहित, अतुल शाह आणि मुंबई महापालिकेचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे उपस्थित होते.