मुंबई : एकनाथ शिंदे आणि ४० आमदार यांनी सत्तेचा त्याग करून सत्ता निर्माण केली. नंतर अनेकांनी शिंदे गट आणि सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश केला आणि आजही करत आहेत. पण मुंबईत अजब घडले. भाजप सत्ताधारी असताना विधिमंडळात विरोधात बसलेल्या शिवसेनेत भाजपच्या माजी नगरसेविकेने प्रवेश केला.
मुंबई महानगर पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीर एक महत्त्वपूर्ण घडमोड समोर आली आहे. भाजपच्या मुंबई जिल्हा उपाध्यक्षांनी हातातील कमळ बाजूला ठेवले आणि मनगटाला शिवबंधन बांधले. भाजपच्या मुंबई जिल्हा उपाध्यक्षा ज्योत्स्ना दिघे यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवबंधन बांधले. यावेळी शिवसेनेचे नेते अनिल परब हे देखील उपस्थित होते. यावेळी दिघे यांच्या समर्थकांनीही शिवसेनेमध्ये प्रवेश केला.