ठाणे : गणपती विसर्जनाच्या दिवशी एका दुर्दैवी घटना ठाण्यात घडली. ठाण्यात एका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मंडपावरच भलामोठा वृक्ष कोसळला. काही गाड्यादेखील या झाडाखाली दबल्या गेल्या. तर यात पाच जण जखणी झालेत. ही घटना ठाण्यातील कोलबाड येथे घडली. कोलबाड मित्र मंडळ या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मंडपासह दोन गाड्यांवर झाड कोसळलं.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी, तसंच अग्निशमन दलाचे जवानही घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर लगेचच बचावकार्य सुरु करण्यात आलं. शुक्रवारी रात्री 8 वाजून 3 मिनिटांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे याबाबतची माहिती प्राप्त झाली होती. त्यानंतर बचावकार्य करण्यासाठी पथक रवाना झालं.
कोलबाड, जाग माता मंदिर, ठाणे पश्चिम इथं हे झाड पडलं होतं. सार्वजनिक मंडप आणि दोन पार्क केलेल्या गाड्यावर झाड कोसळल्यानं मोठं नुकसान यात झालं. याठिकाणी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी व कर्मचारी, वृक्ष प्राधिकरण विभागाचे अधिकारी व कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान यांनी बचावकार्य केलं.
एकूण पाच जण यात जखमी झालेत. त्यांना दोघांना जबर मार लागलाय. उपचारासाठी गंभीर जखमींनी रुग्णालयात दाखलही करण्यात आलंय. राजश्री वालावरकर या 55 वर्षीय महिलेच्या कमरेला दुखापत झाल्याची माहिती मिळतेय. तर 30 वर्षीय प्रतिक वालावरकर या तरुणाच्या उजव्या डोळ्याला आणि कमरेला दुखापत झाली. या जखमी तरुणासह महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याचसोबत किविन्स परेरा, सुहासिनी कोलुंगडे, दत्ता जावळे या तिघांनाही किरकोळ दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे.