शिवहर, बिहार – ही एका अनोख्या प्रेमाची आणि लग्नाची कहाणी आहे. अनोखी याच्यासाठी की या कहाणीत अनेक ट्विस्ट आणि क्लायमेक्स आहेत. ही प्रेम कहाणी सुरु झाली त्यावेळी एका तरुणाने एका तरुणीला फोन केला. पण तो राँग नंबर होता. त्यानंतर हा राँग नंबर या दोघांमध्ये मैत्री आणि प्रेम जुळवळ्यासाठी मात्र करेक्ट नंबर राहिला. त्यांचं लग्नही वेगळ्याच रितीने झाले. धुमधडाक्यात, हॉलमध्ये लग्न न होता या दोन्ही नवदाम्पत्याने पोलीस स्टेशनमध्ये सप्तपदी घेतली. दोघांच्या घरच्यांनी जेव्हा लग्नाला विरोध केला तेव्हा पोलीस ठाण्यातील इन्सपेक्टरने स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत या दोघांचे लग्न लावून दिले. हा सगळा प्रकार बिहारमध्ये घडला. शिवहर जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात हा लग्न सोहळा पार पडला.
कुशहरमध्ये राहणाऱ्या प्रिया कुमारी आणि पहाडपूर गावातील सूरज कुमार हे एकमेकांच्या प्रेमात पडले. प्रिया आणि सूरज यांच्यात संभाषणाची सुरुवात राँग नंबरमुळे झाली. त्यानंतर ते दोघएही एकमेकांशी नियमित बोलू लागले. मैत्री झाली आणि त्याचे रुपांतर प्रेमात झाले. या काळात ते दोघे एकमेकांना भेटायलाही लागले. यातच एक महिन्यापूर्वी या दोघांनी घरच्यांना न सांगता पुनौराधाम मंदिरात एकमेकांशी लग्नही उरकून घेतले. लग्न झाल्यानंतरही ते आपआपल्या घरातच राहत होते.
लग्नाला घरच्यांचा विरोध
ही लग्नाची बाब काही दिवसांतच उघड झाली. त्यानंतर मुलीच्या घरच्यांनी प्रिया कुमारीला बाहेर जाण्यास मनाई केली. दोघांनीही जेव्हा आपआपल्या घरी लग्नाबाबत बोलणी करण्याचा प्रयत्न केला तेव्हा दोन्ही घरातील कुटुंबीयांनी त्याला साफ नकार दिला. घरचे ऐकत नाहीत हे पाहिल्यानंतर हे दोघेही घरातून पळून गेले. त्यानंतर प्रिया कुमारीच्या घरच्यांनी मुलगी पळून गेल्याची तक्रर पोलीस ठाण्यात नोंदवली. या प्रकरणात पोलिसांनी चौकशी केल्यावर त्यांच्या लक्षात आले की या दोघांचा विवाह यापूर्वीच झालेला आहे. मुलीचीही मुलासोबत राहण्याची इच्छा आहे.
त्यानंतर पोलीस स्टेशनचे प्रभारी विजय कुमार यादव यांनी दोन्ही घरातील कुचुंबीयांची समजूत काढली आणि पोलीस ठाण्यातच या दोघांचे लग्न लावून दिले. घरच्यांचा याला विरोध कायम होता, त्यामुळे ते फारसे उत्सुक नव्हते. त्यामुळे पोलीस इन्सपेक्टर यांनी मुलीच्या बाजूने तर स्थानिक लोकप्रतिनिधीने मुलाच्या बाजूने महत्त्वाची भूमिका निभावली. लग्नानंतर मुलगा मुलीला घेवून त्याच्या घरी गेला. आता सगळ्या जिल्ह्यात या वेगळ्या लग्नाच्या गोष्टीची चर्चा सुरु आहे.