एसटीच्या संप काळात सेवा बजावलेल्या कंत्राटी चालकांची सेवासमाप्ती
ऐन गणेशोत्सवात बेकारीची कुऱ्हाड
मुंबई (जयविजय न्यूज) : एसटीच्या संप काळात सेवा सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या कंत्राटी चालकांनी गणेशोत्सवात सेवासमाप्ती करण्यात आली आहे. त्यामुळे गणेशोत्सवात ८०० कंत्राटी चालकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. कंत्राटी चालकांचा वापर कमी होत असल्याने शनिवारापसून त्यांची सेवा बंद करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला.
कंत्राटी कामगारांचे काम कमी झाले
एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करा यासह विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी २७ ऑक्टोबर २०२१ रोजी संप पुकारला होता. जवळपास सहा महिने एसटी कर्मचारी संपावर गेल्याने ग्रामीण भागातील वाहतूक सेवा खोळंबली होती. दरम्यान, ग्रामीण भागातील प्रवाशांची गैरसोय लक्षात घेता संपकाळात एसटी महामंडळाने ८०० चालक आणि वाहकांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती केली. एप्रिल २०२२ मध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटल्याने सर्व चालक-वाहक कामावर रुजू झाले. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांचे काम कमी झाले. मात्र, त्यानंतरही कंत्राटी चालकांची मुदत वाढवण्यात येत होती.
चालकांकडून संताप
सर्व एसटी कर्मचारी कामावर रुजू झाल्याने कंत्राटी कामगारांचा वापर कमी होत आहे. त्यामुळे आता कंत्राटी चालकांचा वापर बंद करण्याचा निर्णय महामंडळा घेतला आहे, शुक्रवारी महामंडळाच्या वाहतूक विभागाकडून तशा प्रकारचे आदेश काढण्यात आले. महामंडळाच्या पडत्या काळात ज्या कंत्राटी चालकांनी मदत केली त्यांनाच ऐन सणासुदीच्या धामधुमीत कामावरून काढून टाकल्याने चालकांनी संताप व्यक्त केला आहे. कंत्राटी चालकांना कामावरून कमी करण्याचा निर्णय म्हणजे गरज सरो अन वैद्य मरो, असा प्रकार असल्याचे सर्वसामान्यांचे म्हणणे आहे.