मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सचिव आणि उद्धव ठाकरेंचे विश्वासू मिलिंद नार्वेकर यांच्या घरी भेट देऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले.
मुंबई : आमदार, खासदार, पदाधिकारी… एकनाथ शिंदे यांनी एकामागून एक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जवळचे मोठ-मोठे नेते आपल्या बाजूने वळवून घेतले. मात्र ठाकरेंचे अत्यंत विश्वासू, निकटवर्तीय किंबहुना शिवसेनेचे संकटमोचक अशी ज्यांची ख्याती आहे, त्या सचिव मिलिंद नार्वेकर यांनाच शिंदे आपल्या गटात ओढून घेतायत की काय, असा प्रश्न निर्माण होत आहे. याचं कारण म्हणजे एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकर यांची भेट.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिलिंद नार्वेकर यांच्या घरी भेट देऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. नार्वेकरांच्या घरी यंदाही गणेशाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. त्या निमित्त राजकीय क्षेत्रातील अनेक जणांनी उपस्थिती लावली.
या भेटीचे फोटो समोर आल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. परंतु भेटीतील गप्पांचा तपशील अद्याप अस्पष्टच असल्याने अनेक गोष्टी गुलदस्त्यात आहेत.
विशेष म्हणजे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निवासस्थानीही एकनाथ शिंदे गेले होते. जोशींच्या निवासस्थानी जाऊन त्यांनी गणरायाचे आशीर्वाद घेतले होते.

दरम्यान, याआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या घरीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक हजेरी लावली होती. राज यांच्या घरी पहिल्यांदाच दीड दिवसांच्या गणपती बाप्पांचे आगमन झाले. गणेशोत्सवानिमित्त आम्ही सगळ्यांची भेट घेत असतो, आज राजकीय नव्हे, तर सदिच्छा भेट होती. गणपतीच्या निमित्ताने आम्ही भेटलो, बाकी काहीच नाही, असं एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंचे निवासस्थान शिवतीर्थहून बाहेर पडल्यानंतर माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं
सुनेत्रा पवार राज ठाकरेंच्या घरी, गप्पा मारत-मारत शर्मिला वहिनी शिवतीर्थाच्या दारापर्यंत
गणेशोत्सवाच्या निमित्ताने दादरमधील राज ठाकरे यांचे निवासस्थान शिवतीर्थ येथे गजबजाट आहे. अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी गुरुवारी दुपारच्या सुमारास राज ठाकरेंच्या घरी जाऊन गणपतीचे दर्शन घेतले. त्यांच्यासोबत काही महिलाही होत्या. सुनेत्रा पवार यांना निरोप देण्यासाठी राज यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे घराच्या दरवाजापर्यंत आल्या होत्या.
काही महिन्यांपूर्वीच राज ठाकरे शिवतीर्थ निवासस्थानी राहायला गेले. नवीन वास्तूत गणपती बाप्पांचे आगमन झाले आहे. राज यांनी पहिल्यांदाच घरी गणरायाची प्रतिष्ठापना केल्यामुळे राजकीय क्षेत्रातील अनेक जणांनी उपस्थिती लावली आहे.
खरं तर राष्ट्रवादी आणि मनसे या दोन्ही पक्षांच्या विचारधारा वेगवेगळ्या आहेत. मात्रा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कुटुंबांचे स्नेहसंबंध जुने आहेत. साहजिकच ठाकरे-पवारांच्या पुढच्या पिढीनेही हे ऋणानुबंध जपले आहेत. त्यामुळे शरद पवारांच्या चुलत सूनबाई सुनेत्रा पवार या बाळासाहेबांच्या चुलत सूनबाई शर्मिला ठाकरे यांच्यासोबत दिसल्या.
राज यांची हिंदुत्ववादी भूमिका
दरम्यान, राज ठाकरे यांनी नुकतीच हिंदुत्ववादी भूमिका अधोरेखित करत मनसेसाठी ‘मी हिंदवी रक्षक, मी महाराष्ट्र सेवक’ हे नवं घोषवाक्य तयार केलं आहे. हिंदुत्वाचा मुद्दा जोरकसपणे मांडताना राज यांनी पहिल्यांदाच घरी गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा केली हे महत्त्वाचं आहे.