- प्रत्यक्ष बाजारपेठेतील कामगिरीच्या आघाडीवर, बीपीसीएलने ४२.५१ एमएमटी अशा सुधारित बाजारपेठ विक्रीची नोंद केली आहे आणि कच्च्या तेलावर प्रक्रिया करून विशिष्ट कालावधीत मिळवलेले उत्पादन अर्थात थ्रूपुट स्टॅण्डअलोन तत्त्वावर ३०.०७ एमएमटी एवढे नोंदवले गेले आहे, २०२१-२२मध्ये हे अनुक्रमे ३८.७४ एमएमटी व २६.४० एमएमटी होते. बीपीसीएलने विक्रीतील वाढीच्या निकषावर सर्व पीएसयू तेल मार्केटिंग कंपन्यांमध्ये पहिले स्थान प्राप्त केले आहे.
- वित्तीय आघाडीवर, आपला करोत्तर नफा स्टॅण्डअलोन तत्त्वावर ८,७८९ कोटी रुपये एवढा होता, मागील वर्षात तो १९,०४२ कोटी रुपये होता. २०२१-२२ मध्ये नुमालीगढ रिफायनरी लिमिटेडमधील भागभांडवलाची विक्री केल्यामुळे एकरकमी उत्पन्न मिळाले होते, त्यामुळे मागील वर्षात करोत्तर नफा बराच अधिक होता. याशिवाय, वर्षभराच्या काळात, मार्केटिंगमधील नफा व इन्व्हेंटरीतून मिळालेला नफा हा शुद्धीकरणातून मिळालेल्या नफ्याच्या तुलनेत कमी राहिल्याने आपला एकूण नफा बराच खाली आला आहे.
- समभागधारकांना मोबदला देण्याची आपली परंपरा कायम ठेवत, संचालक मंडळाने, या वर्षासाठी प्रति समभाग ४१.३१ रुपयांच्या उत्पन्नावर, प्रति समभाग एकूण १६ रुपयांचा लाभांश, जाहीर केला आहे.
कोविड साथीमुळे अभूतपूर्व अशा प्रकारची खीळ बसल्यामुळे, जागतिक अर्थव्यवस्थेपुढे आणि विशेषत: ऊर्जा क्षेत्रापुढे वेगळ्या प्रकारची व तीव्रतेची आव्हाने गेल्या काही महिन्यांपासून उभी राहिली आहेत. चलनवाढीचे उच्च स्तर आणि त्यात भौगोलिकराजकीय ताणांची पडलेली भर यामुळे जगभरातील उद्योगांच्या वाढीत अडथळे येत आहेत. आपल्या देशाचा विचार करता, देशांतर्गत ऑइल मार्केटिंग कंपन्यांचे आर्थिक आरोग्य विलक्षण ताणाखाली आहे.
पारंपरिक ऊर्जा स्रोतांकडून पर्यावरणपूरक ऊर्जा स्रोतांकडे होणारे स्थित्यंतराचे अवघे जग साक्षीदार आहे. ऊर्जाक्षेत्र कायापालटातून जात असल्यामुळे विविधीकरणाची तसेच उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण करण्याची आवश्यकता लक्षात घेऊन, बीपीसीएलने २०२१-२२मध्ये, पर्यावरणपूरक ऊर्जेचा व्यवसाय तसेच ग्राहक रिटेलिंग व्यवसाय यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी रिन्यूएबल एनर्जी व न्यू बिझनेसेस हे नवीन व्यवसाय विभाग स्थापन केले. हा उपक्रम आपल्या एकंदर धोरणाचा भाग असून, हे धोरण आपल्या सर्व समभागधारकांसाठी शाश्वत मूल्यनिर्मितीच्या उद्दिष्टाने तसेच तेल व नैसर्गिक वायूच्या उद्योगात घट होण्याच्या धोक्यापासून त्यांना संरक्षण पुरवण्याच्या उद्दिष्टाने, भविष्यकालीन वाढीच्या सहा आधारस्तंभांभवती आखण्यात आले आहे. हे सहा आधारस्तंभ पुढीलप्रमाणे आहेत- पेट्रोकेमिकल्स, गॅस, रिन्यूएबल्स, न्यू बिझनेसेस अर्थात कंझ्युमर रिटेलिंग, ई-मोबिलिटी व अपस्ट्रीम. शुद्धीकरण व पेट्रोलियम उत्पादनांचे मार्केटिंग हा कंपनीचा प्रमुख व्यवसाय स्थैर्य पुरवण्याचे तसेच निधी उभारणीचे काम कायम राखणार आहे.
हे सहा आधारस्तंभ स्पष्ट करतानाच, पेट्रोकेमिकल्स क्षेत्रातील स्थान भक्कम राखण्यास बीपीसीएलचे प्राधान्य आहे यावर मी विशेष भर देईन. या दिशेने आपण आपल्या एथिलीन क्रॅकर प्रकल्पाची योजना बिना रिफायनरीमध्ये आखली आहे आणि कोची रिफायनरीमध्ये पोलीप्रोपीलीन प्रकल्पाची योजना आहे. यासाठी व्यवहार्यता अभ्यास व अन्य प्रकल्पपूर्व उपक्रम सुरू आहेत. पर्यावरणविषयक मंजुरी प्राप्त झाल्यानंतर हे प्रकल्प पूर्ण होण्यास सुमारे चार वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे आणि २०२६-२७पासून त्यांतून उत्पन्न सुरू होणे अपेक्षित आहे. हे प्रकल्प सुरू झाल्यानंतर, कंपनीच्या उत्पादन पोर्टफोलिओतील पेट्रोकेमिकल्सचा वाटा सध्याच्या १ टक्क्यावरून सुमारे ८ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
देशातील नैसर्गिक वायू व्यवसायाच्या सिटी गॅस डिस्ट्रिब्युशन विभागात, बीपीसीएलकडे आता स्टॅण्डअलोन तत्त्वावर २५ जीएंमध्ये, तर जॉइंट व्हेंचर्स धरून एकूण ५० जीएंमध्ये, सीजीडी नेटवर्क्स विकसित करण्याचे परवाने आहेत. सीजीडी बोलींच्या गेल्या काही फेऱ्यांमध्ये यश प्राप्त झाल्यामुळे, बीपीसीएल देशातील पहिल्या ३ सीजीडी कंपन्यांमधील एक ठरली आहे. याशिवाय, २०२१-२२ मध्ये ८ नवीन जीएंमध्ये व्यावसायिक कामकाज सुरू झाले आहे, तर अन्य जीएंमधील कामही सुरू होण्याच्या मार्गावर आहे.
हवामान स्थिर करण्यामध्ये योगदान देत तसेच राष्ट्रीय प्राधान्यक्रमांशी संलग्नता राखत, बीपीसीएलने, २०४० सालापर्यंत स्कोप वन व स्कोप टू या टप्प्यांमध्ये शून्य उत्सर्जन उद्दिष्ट साध्य करण्याची इच्छा जाहीर केली आहे. अशी इच्छा जाहीर करणारी बीपीसीएल ही पहिलीच सार्वजनिक क्षेत्रातील (पीएसयू) ऑइल मार्केटिंग कंपनी आहे. कंपनीने या उद्दिष्टाप्रती वाटचाल करण्याच्या उद्देशाने एक एनर्जी ट्रांझिशन कौन्सिलही स्थापन केली आहे. या प्रवासाचा तपशीलवार आराखडा तयार करण्यात आला असून, यातील महत्त्वाचे टप्पेही निश्चित करण्यात आले आहेत. रिन्यूएबल एनर्जी व्यवसाय विभाग, नूतनीकरणीय ऊर्जेच्या क्षेत्रातील व्यावसायिक व्हेंचर्समध्ये सहभाग घेण्याच्या माध्यमातून कंपनीच्या पर्यावरणपूरक उपक्रमांना चालना देण्यात व त्यात योगदान देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. बीपीसीएलने आपल्या नूतनीकरणीय ऊर्जेच्या पोर्टफोलिओमध्ये मोठी वाढ करण्याची योजना आखली आहे. आज ५० मेगावॉट्सहून कमी असलेले उत्पादन, २०२५ सालापर्यंत १ गिगावॉट व २०४० सालापर्यंत १० गिगावॉट एवढे करण्याची कंपनीची योजना आहे आणि या दिशेने वेगवेगळ्या सेंद्रीय व असेंद्रीय संधींचा धांडोळा घेण्यासही कंपनीने सुरुवात केली आहे. राष्ट्रीय जैवइंधन कार्यक्रमात मनापासून सहभाग घेत, बीपीसीएलने अलीकडेच पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉलचे मिश्रण साध्य केले आहे आणि सरकारने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार मिश्रण टक्केवारी वाढवण्यास कंपनी बांधील आहे.
कंझ्युमर रिटेलिंग्ज हा देशातील सर्वाधिक वेगाने वाढणारा विभाग असून, हा व्यवसाय नव्या स्वरूपात करण्यासाठी आपण नावीन्यपूर्ण पावले उचलत आहोत. सुरुवातीला छोटी शहरे व ग्रामीण भागावर भर दिल्यानंतर, अलीकडेच स्थापन करण्यात आलेल्या न्यू बिझनेसेस या नवीन विभागाने एक अनन्यसाधारण डिजिटली एनेबल्ड सर्वमार्गीय व्यवसाय प्रारूप विकसित केले आहे. त्यायोगे भारतीय बाजारपेठेतील सर्वांत निम्न वर्गाला इंधन व इंधनेतर उत्पादने पुरवली जातील. ‘उर्जादेवी’ या ग्रामीण भागातील महिला उद्योजकांशी समन्वय साधून ही उत्पादने पुरवली जातील. स्थापनेनंतरच्या पहिल्याच वर्षात या विभागाने तालुक्यांमध्ये ३० ‘इन अँड आउट स्टोअर्स’ सुरू केली आहेत आणि ग्रामीण भागात ३०० ऊर्जादेवींची नोंदणी केली आहे. २०२२-२३ मध्ये १,५०० इन अँड आउट स्टोअर्स स्थापन करण्यासाठी तसेच १५,००० ऊर्जादेवींच्या नोंदणीसाठी हा विभाग काम करत आहे.
इलेक्ट्रिक वाहतुकीच्या क्षेत्रात, चारचाकी वाहनांच्या पल्ल्याबाबत भेडसावणाऱ्या चिंतेचे निराकरण करण्याच्या दृष्टीने, आपण हायवे फास्ट चार्ज कॉरिडॉर्स ही नावीन्यपूर्ण संकल्पना सर्वांपुढे आणली आहे. चेन्नई-त्रिची-मदुराई महामार्गावरील (एनएच-४५) ९०० किलोमीटरच्या पट्ट्यात हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर, आता २०२२-२३मध्ये ही सुविधा २०० हायवे कॉरिडॉर्समार्फत विस्तारण्याची आपली योजना आहे. यात २,००० रिटेल आउटलेट्सचा समावेश आहे. याशिवाय, आपण ईव्ही पार्टनर्सच्या सहयोगाने आपल्या रिटेल आउटलेट्सवर चार्जिंग सुविधा देत आहोत तसेच संपूर्ण ईव्ही मूल्यसाखळीमध्ये बॅटरी स्वॅपिंगसारख्या संधींचाही शोध घेत आहोत. मध्यम ते दीर्घकालीन टप्प्यात सुमारे ७,००० पारंपरिक रिटेल आउटलेट्सचे रूपांतर एनर्जी स्टेशन्समध्ये करून इंधनाला पर्याय पुरवण्यास आपण बांधील आहोत.
अपस्ट्रीम बिझनेसबद्दल सांगायचे तर, भारत पेट्रोरिसोर्सेस लिमिटेड या आपल्या संपूर्ण मालकीच्या उपकंपनीने, तिच्या सर्वांत मोठ्या संशोधन प्रकल्पात, म्हणजेच ब्राझिलमधील बीएम सील इलेव्हन कन्सेशन्समध्ये, मोठा टप्पा साध्य केला आहे. डिसेंबर २०२१ मध्ये सापडलेल्या तेल व नैसर्गिक वायूच्या व्यावसायिक वापराचे घोषणापत्र समूहाने सादर केले आहे. या प्रकल्पात सुमारे १.६ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्यासाठी बीपीसीएलला आर्थिक व्यवहारांसंदर्भातील कॅबिनेक समितीने नुकतीच मंजुरी दिली आहे. क्षेत्र विकास आराखडा व अंतिम गुंतवणूक निर्णय लवकरच सादर केला जाण्याची शक्यता आहे, त्यानंतर बांधकामाला सुरुवात होईल. मोझांबिकमध्ये बीपीआरएल अन्य समूह सदस्यांसोबत टू-ट्रेन एलएनजी प्रकल्प विकसित करत आहे, सुरक्षितताविषयक स्थितीमध्ये सुधारणा होत आहे आणि समूह प्रकल्प लवकरात लवकर पुन्हा सुरू करण्यासाठी काम करत आहे.
डिजिटलायजेशनच्या शक्तीचा लाभ करून घेत आपण आपल्या ‘प्रोजेक्ट अनुभव’खाली डिजिटल रूपांतरणाच्या प्रवासात पुढे चाललो आहोत. यामुळे अपवादात्मक सुविधांच्या माध्यमातून नवोन्मेषकारी उपयोजने व उपाय विकसित झाले आहेत आणि त्यायोगे आमच्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या आमच्या ग्राहकांसाठी विश्वासाचे वातावरण, सोय व पर्सनलायझेशन शक्य होत आहे. त्याचबरोबर आमच्या कामकाजातील पारदर्शकता व कार्यक्षमताही सुधारत आहे. हॅलोबीपीसीएल, आयरीस, ऊर्जा, यूफिल, अॅडव्हान्स्ड लॉयल्टी प्रोग्राम व सेल्सबडी यांसारखी अॅप्लिकेशन्स आज प्रभावी ब्रॅण्ड्स ठरले आहेत आणि त्यांचा वापर दिवसागणिक वाढत आहे.
बीपीसीएलसाठी समुदाय विकास हा आपल्या उद्योग तत्त्वज्ञानाचा अविभाज्य भाग राहिला आहे आणि आपले कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी उपक्रम आपल्या समुदायांसोबतच्या एकात्मिकतेची अभिव्यक्ती आहेत. बीपीसीएल एक कर्तव्यनिष्ठ कॉर्पोरेट नागरिक असून, समाजाला सेवा पुरवण्यात तसेच राष्ट्रबांधणीत अग्रेसर राहिले आहे. कोविडच्या काळातही कंपनीने बरेच काम केले आहे. देश साथीविरोधात लढा देत असताना आपण विविध मार्गांनी मनापासून योगदान देत आहोत. यामध्ये आपल्या शुद्धीकरण प्रकल्पांतील ऑक्सिजन रुग्णांना पुरवण्यापासून ते सरकारी आरोग्यव्यवस्थेवरील ताण कमी करण्याच्या उद्देशाने कोविड-केअर आस्थापने स्थापन करण्यापर्यंत अनेक उपक्रमांचा समावेश होतो.
सध्याच्या कच्च्या तेलाच्या भडकलेल्या किमती व जागतिक अर्थव्यवस्थेतील तरलता यांच्या पार्श्वभूमीवर, बीपीसीएल उत्क्रांत होत जाणाऱ्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे, आपल्या प्रतिसादात आवश्यक तो बदल घडवून आणत आहे, आणि कंपनीचे आर्थिक आरोग्य निकोप राहावे यासाठी आवश्यक त्या सर्व कृती व उपाय करत आहे, कार्यक्षमता सुधारत आहेत तसेच तंत्रज्ञानाचा लाभ घेऊन नवीन क्षमता निर्माण करत आहे.
बीपीसीएल ही एक अत्यंत समायोजनशील, व्यावहारिक आणि चपळ कंपनी असून, आगामी वर्षांतही आपल्या सर्व समभागधारकांसाठी उत्तम मूल्य निर्माण करण्यासाठी परिश्रमपूर्वक काम करत राहील आणि आपल्या प्रवासात अनेक वैभवशाली टप्प्यांची भर घालत राहील.